Maharashtra Latest News: महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगावसह इतर मराठी भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी महाराष्ट्रातून करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या आमदाराने थेट मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करावे, अशी विधान केले. कर्नाटक विधानसभेत केलेल्या विधानाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले असून, शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीलाच सुनावले आहे.
काँग्रेसचे कर्नाटकातील अथनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाबद्दल आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
आदित्य ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांना काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, अशी मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, "मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप... कोणताही पक्ष असो... मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही."
"मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी", अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी काँग्रेस आमदारांच्या विधानावर म्हटले आहे.
आमदार लक्ष्मण सवदींचे विधान काय?
कर्नाटक विधानसभेत बोलताना सवदी म्हणालेले की, "महाराष्ट्रातील एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असे विधान केले. जर कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेल्या बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल, तर मुंबई देखील केंद्रशासित करा."
"आमचे पूर्वज देखील मुंबईमध्ये वास्तव्याला होते. त्यामुळे आमचा मुंबईवर अधिकार आहे. पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. आधी मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. महाराष्ट्राला बेळगाव हवे असेल, तर त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेली मुंबई कर्नाटकला द्यावी. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा", असे विधान आमदार सवदी यांनी केले होते.