मुंबई - मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये मिरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये तणाव वाढवणाऱ्या घटना घडलेला आहेत. भाषेवरून द्वेष व वितुष्ट निर्माण करण्यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यातून कोणाला राजकीय फायदा होत आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु असा तणाव निर्माण होणे समाजाच्या हिताचे नाही म्हणून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेत मीरा भाईंदरमध्ये मंगळवार दिनांक १५ जुलै २०२५ रोजी “आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा”संवाद संगोष्ठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रात देशाच्या सर्वच भागातून नोकरी, धंद्याच्या निमित्ताने आलेले लोक एकत्रितपणे राहतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, आपले स्वप्न साकारण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबई व परिसरात येत आहेत व या शहराने नेहमीच या सर्वांना सामावून घेतले आहे. विविधतेत एकता ही आपली ओळख आहे पण ही ओळख पुसण्याचे काम काही लोक करत आहेत. भाजपाचा खासदार निशिकांत दुबेसारखे राज्याबाहेरील नेते प्रक्षोभक विधाने करून या वादाला खतपाणी घालत आहेत.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होत आहेत. या निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी हा वाद निर्माण केला जात आहे. याचा फायदा कोणाला होतो हे सर्वश्रुत आहे. पण याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वांनी एकोप्याने बंधुभावाने रहावे यासाठीचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर जिल्हा काँग्रेस कमिटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून मीरा रोडच्या नयानगर येथील अस्मिता क्लब येथे दुपारी २.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.