विधिमंडळातील डावपेचांवर काँग्रेस, राष्ट्रवादीची बैठक
By Admin | Updated: July 1, 2015 01:24 IST2015-07-01T01:24:41+5:302015-07-01T01:24:41+5:30
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांचे घोटाळे, बनावट पदव्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दुरवस्था या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा निर्णय काँग्रेस
विधिमंडळातील डावपेचांवर काँग्रेस, राष्ट्रवादीची बैठक
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांचे घोटाळे, बनावट पदव्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दुरवस्था या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदावरील दाव्यावरून तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास प्रस्तावामुळे विरोधकांमधील फुटीचे दर्शन घडले होते. मात्र दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत सरकारला धारेवर धरण्याचा निर्णय झाला. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर अशा एकेका मंत्र्यांचे प्रकरण सध्या गाजत आहे. यावरून सरकारला लक्ष्य करण्याचे बैठकीत ठरले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात प्रगती झालेली नाही. राज्याच्या अनेक भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आयपीएलचे वादग्रस्त माजी कमिशनर ललित मोदी यांची भेट घेतल्याचे प्रकरण ताजे आहे. अशा मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचे ठरले. त्याचबरोबर सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना हेतूत: चौकशीच्या प्रकरणात अडकवत असून त्याचाही ठाम विरोध करण्याचे यावेळी ठरले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील, माणिकराव ठाकरे आदी नेते बैठकीस हजर होते. (विशेष प्रतिनिधी)