काँग्रेस-राष्ट्रवादीला धाकधूक
By Admin | Updated: October 16, 2014 04:31 IST2014-10-16T04:31:43+5:302014-10-16T04:31:43+5:30
राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले

काँग्रेस-राष्ट्रवादीला धाकधूक
राज्याच्या सत्तासोपानासाठी महत्त्वाच्या ठरणा-या २४ जागा असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत यंदा विक्रमी मतदान झाले आहे़ सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने मताचा टक्का वाढला. १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात ५३, तर पालघर जिल्ह्यात ६४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे़
मतदानाची वाढलेली टक्केवारी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठोके चुकविणारी ठरू शकते़ दोन्ही जिल्ह्यांत शिवसेना-भाजपाच्या जागा वाढतील, असे वाढलेल्या मतदानावरून दिसते़ ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईत ५० टक्क्यांच्या वर मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे़ ठाणे शहर आणि कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथमध्ये मराठी मतदार एकवटल्याने शिवसेनेचा बोलबाला राहील, असे दिसते़ डोंबिवली, मुरबाड, विक्रमगड, भिवंडी ग्रामीण येथे पुन्हा कमळ खुलू शकते़
मतदान वाढल्याने वसई-नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीची शिटी कितपत वाजते, यात शंका आहे़ कळवा-मुंब्य्रात एकूण उमेदवारांत ९ मुस्लीम असल्याने त्याचा फायदा माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना होण्याची शक्यता आहे़ कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेतील मतभेदांमुळे व भाजपाच्या सहकार्यामुळे मनसेचे इंजिन धावू शकते़ पालघरमध्ये माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना मोठी कसरत करावी लागली.
मावळत्या विधानसभेत दोन्ही जिल्हे मिळून शिवसेना (६ + १) ७, भाजपा ४, राष्ट्रवादी (५ +१) ६, बहुजन विकास आघाडी - २, मनसे- २ आणि समाजवादी, सीपीएम आणि काँगे्रस प्रत्येकी १ असे २४ आमदार होते़