Congress MP Rahul Gandhi Visit Parbhani: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणी दौऱ्यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील व त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. या दोन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील व संध्याकाळी ५.१५ वाजता विमानाने दिल्लीला जातील.
परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लोकांना अमानुष मारहाण केली होती. निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाला अटक केली होती, त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना विजय वाकोडे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राहुल गांधी परभणी दौरा करत आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला
परभणीतील स्थिती अतिशय गंभीर आहे. मी तिथे कुटुंबीयांना भेटून आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून स्थिती अतिशय गंभीर असून, काळजीपूर्वक नोंद घेतली पाहिजे, असे सांगितले असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनातील हिंसक प्रकार याची न्यायालयीन चौकशी करण्याची तसेच या प्रकरणातील वादग्रस्त पोलिस अधिकारी अशोक घोरबांड यांच्या निलंबनाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.