काँग्रेस-राकाँ नेत्यांच्या मुली भाजपच्या संपर्कात

By Admin | Updated: August 17, 2014 00:42 IST2014-08-17T00:42:42+5:302014-08-17T00:42:42+5:30

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्यामुळे अनेक काँग्रेस नेते हादरलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागण्यापेक्षा आपल्या

Congress-Leader's daughters are in touch with BJP | काँग्रेस-राकाँ नेत्यांच्या मुली भाजपच्या संपर्कात

काँग्रेस-राकाँ नेत्यांच्या मुली भाजपच्या संपर्कात

राजकीय गोटात खळबळ : महिला काँग्रेस प्रदेश प्रतिनिधीच्या मुलीने मागितली भाजपकडे उमेदवारी
अभिनय खोपडे - गडचिरोली
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्यामुळे अनेक काँग्रेस नेते हादरलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागण्यापेक्षा आपल्या कुटुंबातील सदस्यांना भाजप, शिवसेनेकडे उमेदवारीसाठी मोकळे सोडण्याचा प्रकार सुरू झाला आहे. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातही काँग्रेस-राकाँतील दोन मोठ्या नेत्यांच्या मुलींनी भाजपकडे उमेदवारीसाठी संपर्क केल्याने आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, अहेरी, आरमोरी हे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. तीनही मतदार संघ अनुसूचित जमाती राखीव आहेत. आघाडीच्या तिकीट वाटपात अहेरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर आरमोरी व गडचिरोली काँग्रेसकडे आणि युतीच्या तिकीट वाटपात आरमोरी सेनेकडे व गडचिरोली व अहेरी भाजपकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांनी आपल्या यजमानांना घेऊन भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केला होता.
मात्र पक्षाच्या राष्ट्रीयस्तरावरील एका माजी अध्यक्षांनी तुम्हाला गडचिरोलीची उमेदवारी देऊ मात्र अहेरीची सीट तुम्हाला काढून द्यावी लागेल, अशी अट घातली. अहेरी येथून भाजप नाग विदर्भ आंदोलन समितीच्या केंद्रीय अध्यक्षांना मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरूध्द राकाँकडून स्वत: धर्मरावबाबा आत्राम रिंगणात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाग्यश्री आत्राम यांनी भाजपकडून माघार घेत आता आघाडीच्या विरोधात गडचिरोली क्षेत्रातून बंडखोर म्हणून विधानसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या वडिलांनी असे स्पष्ट संकेत जाहीररित्या दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या निकटवर्तीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव सगुना तलांडी यांच्या कन्येने गडचिरोली येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी निरिक्षकांची भेट घेतली आहे व आपल्याला पक्षाची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी दुजोरा दिला आहे. तलांडी यांच्या कन्येने पक्षनिरीक्षकांची भेट घेतली, असे त्यांनी सांगितले.
कूणच काँग्रेस, राष्ट्रवादीतील जुन्या व मुरब्बी नेत्यांनी आपल्या मुला, मुलींसाठी आता दुसऱ्या पक्षाचे दार ठोठविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे आघाडीच्या गोटातील पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ असून दोन्ही पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title: Congress-Leader's daughters are in touch with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.