Vijay Wadettiwar on Aurangzeb Tomb: छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या नावावरून महाराष्ट्रात सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. हिंदुत्ववादी संघटनांकडून आता थेट औरंगजेबाची कबर पाडण्यापर्यंत मागणी करण्यात आलीय. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीजवळ सुरक्षा वाढवण्यात आली आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने राज्य सरकारकडे केली आहे. यावरुन आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास बाबरीसारखी कारसेवा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या विहिंप आणि बजरंग दलाच्या मागणीबद्दल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
"त्यांच्याकडे आणखी काही काम उरलेलं नाही. फक्त हिंदुत्वाच्या नावावर राजकारण केलं जात आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याच्या आधी तुम्ही जी पापं केली आहेत त्याकडे पाहा. ४०० वर्षापूर्वीच्या कबरीवर राजकारण करणं आणि इतिहास मोडून तोडून सांगणे, सणांमध्ये एकमेकांमध्ये भांडणे लावून देणे यासारख्या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. या लोकांना महाराष्ट्रातल्या जनतेला शांततेने जगू द्यायचं नाही. राज्य नेहमीच अस्थिर ठेवण्याचे काम केलं जात आहे. औरंगजेब २७ वर्षे इथे होता तेव्हा तो महाराष्ट्राचे काहीही बिघडवू शकला नाही. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची कबर खोदून तुम्हाला काय मिळणार आहे," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, औरंगजेबाची कबर पाडण्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हालाही तेच वाटतं असं म्हटलं होतं. "आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं. फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. कारण ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं संरक्षण मिळालेलं आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.