काँग्रेसची नागपुरातून प्रचार सुरू करणार
By Admin | Updated: July 16, 2014 02:50 IST2014-07-16T02:50:07+5:302014-07-16T02:50:07+5:30
काँग्रेसला इतिहासात अनेकदा साथ देणाऱ्या विदर्भातूनच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

काँग्रेसची नागपुरातून प्रचार सुरू करणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने खचून न जाता काँग्रेसला इतिहासात अनेकदा साथ देणाऱ्या विदर्भातूनच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अ.भा. काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, अ.भा. सरचिटणीस मुकुल वासनिक आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत विदर्भातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक गांधी भवनात झाली.
नागपुरात येत्या २४ जुलै रोजी काँग्रेसचा विदर्भस्तरीय मेळावा होणार आहे. या मेळाव्याला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. आजच्या बैठकीत विदर्भातील प्रश्न, त्यांची सोडवणूक याबाबत चर्चा झाली. मुकुल वासनिक हे येत्या काही दिवसांत विदर्भातील पक्षाची निवडणूक रणनीती, निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याचे विषय यासंदर्भात प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करतील.
बैठकीला अ.भा. काँग्रेसचे सचिव खा. अविनाश पांडे, शिवाजीराव मोघे, नितीन राऊत, संजय देवतळे, राजेंद्र मुळक हे मंत्री, सुधाकर गणगणे, विधान परिषदेचे उपसभापती प्रा. वसंत पुरके, आ. विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, निवडणूक प्रचाराचे नियोजन करण्यासाठी नागपूर आणि अमरावती विभागासाठी पाच-पाच नेत्यांचा समावेश असलेल्या दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)