भाजपाने घेतले काँग्रेसरुपी सडक्या गालाचे चुंबन - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: July 17, 2015 14:13 IST2015-07-17T13:34:32+5:302015-07-17T14:13:18+5:30

सत्तेसाठी गोंदियात झालेली भाजपा-काँग्रेस युती सेनेला झोंबली असून भाजपाने ही युती करून काँग्रेसरुपी सडक्या गालाचे चुंबन घेतल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

The Congress has taken congressional street kissing - Uddhav Thackeray | भाजपाने घेतले काँग्रेसरुपी सडक्या गालाचे चुंबन - उद्धव ठाकरे

भाजपाने घेतले काँग्रेसरुपी सडक्या गालाचे चुंबन - उद्धव ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - गोंदिया जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी झालेली भाजपा-काँग्रेसची युती शिवसेनेला चांगलीच झोंबली असून ही काय (काळा) कांडी आहे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनातून विचारला आहे. सत्तेसाठी २५ वर्षांचे मित्र दुश्मन होतात तर जन्माचे वैरी अचानक मित्र बनतात अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे. 
भाजपने कोणाचा सडका गाल चुंबावा हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न आहे, तरी महाराष्ट्रातील जनतेला गोंदियाचा गोंद्या हलवा पचनी पडेल असे वाटत नाही. ज्यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर लढायचे, वस्त्रहरण करायचे त्याच वस्त्रहरणातील चिंधी उपरणे म्हणून खांद्यावर टाकून मिरवायचे. यामुळे तात्पुरते सुख मिळाले असले तरी या सुखाचे काटे भविष्यात टोचतील, असा इशाराही लेखातून देण्यात आला आहे. तसेच सत्तेसाठी काँग्रेस -राष्ट्रवादीशी मिठ्या मारणे ही जनतेशी प्रतारण आहे, असेही उद्धव यांनी भाजपाला सुनावले आहे. 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
- राजकारणात कोण कुणाच्या गळ्यात गळा घालेल ते सांगता येत नाही व कोण कुणाची तंगडी ओढेल त्याचा भरवसा नाही. पंचवीस वर्षांचे मित्र दुश्मन होतात तर जन्मापासूनचे वैरी अचानक मित्र बनतात. हा सर्व चमत्कार सत्ता व मत्तेचा आहे. या चमत्काराची कांडी विदर्भ भूमीत गोंदिया जिल्ह्यात फिरली असून या कांडीने अनेकांची डोकी गरगरली आहेत. राष्ट्रवादीस सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी व पदरात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पाडून घेण्यासाठी भाजपने कॉंग्रेसला कवेत घेतले आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला आहे व विधानसभेत कॉंग्रेसने भाजप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे व अनागोंदीचे आरोप केले. त्यामुळे कॉंग्रेसने भ्रष्टाचारास मिठी मारली की भाजपने कालच्या भ्रष्टाचार्‍यांना पवित्र करून सोयरिक जमवली हे कळायला मार्ग नाही. म्हणजे भाजपला कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारी वाटला नाही आणि कॉंग्रेसलाही भाजप जातीयवादी असल्याचा विसर पडला. हा एक चमत्कारच आहे. 
- भंडारा व गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या व निकाल भाजपच्या विरोधात गेले. तेथे कॉंग्रेस-राष्ट्रवादीस यश मिळाले हे दुर्दैवच म्हणावे लागेल. लोकांचा हा कौल मान्य करून विरोधी पक्षात बसायला काहीच हरकत नाही. किंबहुना आम्ही आमच्या सर्वच शिवसैनिकांना आधीच सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील महानगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांत सत्तेच्या तुकड्यांसाठी असंगाशी संग करून उगाच ‘बाटवा बाटवीत’ पडू नका व दुसर्‍यांचा नायटा आपल्या अंगावर घेऊन लोकांच्या संतापाचे धनी बनू नका. ज्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीविरोधात झगडे करायचे व त्यांनाच बोहोल्यावर घेऊन सत्तेसाठी मिठ्या मारायच्या ही लोकांशी प्रतारणा आहे. 
- भाजपास आमचा दोस्त मानतो व दोस्तास दोन प्रेमाचे व भल्याचे शब्द सांगणे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. भंडारा-गोंदियाच्या मार्गाने संपूर्ण विदर्भ जाऊ नये, कारण विदर्भ पाठीशी होता म्हणून ‘भाजपा’स आजचे दिवस दिसले. त्यामुळे विदर्भाचे मानस ओळखण्यात चूक होऊ नये व विदर्भाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत. विदर्भाची संस्कृती ही श्रद्धेची व संस्काराची आहे. विदर्भ अनेकदा एखाद्यावर विश्‍वास टाकला की आपले सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करतो. त्या श्रद्धेचा व संस्काराचा मान राहावा याच भावनेतून आम्ही गोंदियाचा हलवा पेश केला आहे!
 

Web Title: The Congress has taken congressional street kissing - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.