काँग्रेसचे ८० उमेदवार निश्चित
By Admin | Updated: September 10, 2014 03:05 IST2014-09-10T03:05:41+5:302014-09-10T03:05:41+5:30
राज्यातील काँग्रेसच्या ८० मतदारसंघांसाठी एकेका उमेदवाराचे नाव छाननी समितीने निश्चित केले असून जवळपास ७४ मतदारसंघांसाठीची नावे अद्याप छाननी समितीच्या पातळीवर ठरलेली नाहीत

काँग्रेसचे ८० उमेदवार निश्चित
यदु जोशी, मुंबई
राज्यातील काँग्रेसच्या ८० मतदारसंघांसाठी एकेका उमेदवाराचे नाव छाननी समितीने निश्चित केले असून जवळपास ७४ मतदारसंघांसाठीची नावे अद्याप छाननी समितीच्या पातळीवर ठरलेली नाहीत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जवळपास २० मतदारसंघ असे आहेत की जिथे प्रत्येकी दोन-दोन नावे छाननी समितीने ठरविली. एकूण १०० मतदारसंघांसाठीची नावे केंद्रीय निवड मंडळाकडे गेल्या आठवड्यात पाठविण्यात आली होती. त्यातील २० मतदारसंघांबाबत छाननी समितीने पुन्हा चर्चा करून एकेकच नाव आपल्याकडे पाठवावे, असे केंद्रीय निवड समितीने सुचविले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या निवड समितीच्याही अध्यक्ष आहेत.
७४ मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. या ७४ मतदारसंघासह जिथे दोन-तीन नावे आहेत असे २० मतदारसंघ मिळून ९४ मतदारसंघांसाठी एकेक नाव निश्चित करण्यासाठी केंद्रीय नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीची बैठक बुधवार किंवा गुरुवारी मुंबईत होणार आहे. खरगे समितीने ठरविलेल्या नावांवर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय निवड मंडळाची बैठक १३ किंवा १४ सप्टेंबरला दिल्लीत होईल. गणेश विसर्जनानंतर इच्छुकांनी आजपासून नव्याने जोरात प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी राजकीय गॉडफादरमार्फत प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.