काँग्रेसने केला उपसभापतींचा निषेध
By Admin | Updated: March 14, 2015 04:34 IST2015-03-14T04:34:33+5:302015-03-14T04:34:33+5:30
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान माणिकराव ठाकरे यांना बोलण्याची संधी नाकारल्याचा मुद्दा पुढे करत काँग्रेस सदस्यांनी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे
काँग्रेसने केला उपसभापतींचा निषेध
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान माणिकराव ठाकरे यांना बोलण्याची संधी नाकारल्याचा मुद्दा पुढे करत काँग्रेस सदस्यांनी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
राष्ट्रवादीने सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यापासून आघाडीतील दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली धुसफूस अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बाहेर आली. गुरुवारीची ही चर्चा शुक्रवारी पुढे सुरू झाली. मुख्यमंत्री ११ वाजता चर्चेला उत्तर देणार असल्याने तत्पूर्वी सदस्यांची भाषणे संपविण्याचे ठरले होते. मात्र, दुपारी १२ वाजले तरी सदस्यांची भाषणे सुरू होती. त्यानंतर सदस्यांची भाषणे थांबवत डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तराचे भाषण सुरू करण्यास सांगितले. यावर भाषणाची संधी हुकलेल्या माणिकराव ठाकरेंसह काँग्रेस सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. सदस्यांचा हक्क डावलण्यात येत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केल्याने सदस्यांनी शांत व्हावे, असे आवाहन करत डावखरेंनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही काँग्रेस सदस्यांचा गोंधळ सुरूच होता. (विशेष प्रतिनिधी)