काँग्रेसचे ११८ उमेदवार जाहीर
By Admin | Updated: September 25, 2014 05:45 IST2014-09-25T05:45:12+5:302014-09-25T05:45:12+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ११८ काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत जाहीर करण्यात आली.

काँग्रेसचे ११८ उमेदवार जाहीर
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ११८ काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे, वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, रोहयोमंत्री नितीन राऊत, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री सतेज पाटील, राजेंद्र गावित, डी.पी.सावंत, रणजित कांबळे, अमित देशमुख आदी विद्यमान मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी झालेली नसतानाही काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली. नवापूर, मालेगाव अशा मतदारसंघांमध्ये स्थानिक आमदारांना आपल्याकडे आणून आघाडीत उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, पण या दोन्ही ठिकाणी उमेदवार जाहीर करून काँग्रेसने राष्ट्रवादीचा दबाव झुगारला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील ११४ जागांपैकी मात्र कुठेही काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केली नाही.
विधानसभेतील सर्वात वयोवृद्ध अप्पासाहेब सा. रे.पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांना चिमूरऐवजी ब्रह्मपुरीतून उमेदवारी दिली आहे. चिमूरमध्ये माजी आमदार अविनाश वारजूरकर हे उमेदवार असतील. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांना दक्षिण मुंबईतील मलबार हिल मतदारसंघात संधी मिळाली. त्या माजी मंत्री बी.ए.देसाई यांच्या कन्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)