Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी हा प्रदेशाध्यक्षच आहे. जे गेले ते जाऊ द्या, गेले ते कावळे होते व राहिले ते मावळे आहेत आणि मी तुमच्या बरोबर आहे असे आश्वस्त करत दोन दिवसांची कार्यशाळा संपली असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. आता Action, Action आणि Action वरच भर द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय खेचून आणा व काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांसह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील भाजपा युतीच्या सरकारने १० लाख कोटीचे कर्ज करून ठेवले आहे व १ लाख ७८ कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. महाराष्ट्राला देशोधडीला लावले आहे. ६ महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत. शिक्षक भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून हा भ्रष्टाचार व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन काम करावे सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहेत, अशी ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी दिली.
काँग्रेस पक्षाची राज्यात आजही मोठी ताकद
काँग्रेस पक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची राज्यात आजही मोठी ताकद आहे, १४ खासदार आहेत, आमदारांची संख्या कमी असली तरी आवाज कमी नाही. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा लढवय्या आहे. जोमाने काम करा व काँग्रेस पक्षाला गत वैभव प्राप्त करुन द्या, असे आवाहन करत आपल्याला राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे, असे माजी मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीवर बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, त्या दोघांच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. राज ठाकरे अद्याप मविआत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की चर्चा करून काँग्रेस निर्णय घेईल. नवीन कार्यकारिणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नवीन चेहरे आहेत. काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम करा. लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या लढाईला शक्ती द्या. लोकशाही व संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत. ही लढाई मोठी व कठीण आहे. पण आपण सर्वजण राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू, असे चेन्नीथला म्हणाले.