Congress Harshwardhan Sapkal News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा थेट लोकशाहीवरील हल्ला आहे. मनुवादी विचारसरणीचे उद्दात्तीकरण करण्याचा हा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी असेच विकृत कृत्य डोंबिवली परिसरातील काँग्रेसचे मामा पगारे यांच्याबाबत घडले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी समाज माध्यमात संदेश टाकला. तेव्हा टोळक्याने त्यांना दवाखान्यातून बाहेर ओढत नेले. जातीवाचक शिवीगाळ करत घृणास्पद प्रकार केला होता. त्याच प्रकारे पुढील पाऊल सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळाले, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध नोंदवला.
खटल्याचे कामकाज सुरू असतानाच एका वकिलाने भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सरन्यायाधीशांना कोणतीही इजा झाली नाही. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेकांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. या घटनेतील हल्लेखोर वकिलाचे नाव राकेश किशोर असे आहे. या प्रकाराबाबत खंत नसल्याची प्रतिक्रिया राकेश किशोर यांनी दिली आहे. यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.
सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा
पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस व्यापक स्वरुपात आंदोलनातून निषेध करीत आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला करणारा कोण शर्मा की तिवारी होता, ते जाहीर करावे. संबंधित वकिलाचे आडनाव जाणूनबुजून लपवले जात आहे. नागरिकांनी वेळीच पावले उचलायला हवीत. अन्यथा सर्वत्र घराघरात अशा घटना घडतील. सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बूटफेकीच्या प्रकारानंतर सरन्यायाधीश हे अविचल होते. त्यांनी कामकाजही थांबवले नाही. अशा घटनेने कोणीही विचलित होऊ नये, आम्हीही झालेलो नाही. अशा घटनांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली.