‘काँग्रेसचा गड गेला आणि सिंहही गेले’
By Admin | Updated: May 17, 2014 03:53 IST2014-05-17T03:53:23+5:302014-05-17T03:53:23+5:30
विदर्भात भूकंप होणार आहे, याचा अंदाज आला होता. पण ही तर त्सुनामी निघाली.

‘काँग्रेसचा गड गेला आणि सिंहही गेले’
विदर्भात भूकंप होणार आहे, याचा अंदाज आला होता. पण ही तर त्सुनामी निघाली. तिच्या तडाख्यात प्रफुल्लभाई पटेल, मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार हे एक से एक दिग्गज तसेच मुख्यमंत्र्यांनी अखेरच्या क्षणी उभे केलेले शिवाजीराव मोघे व संजय देवतळे हे दोन ज्येष्ठ मंत्री वाहून गेले. अमरावतीत शरद पवार यांच्या एकेकाळच्या कार्यकर्त्यांनीच शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना निवडून आणले. अडसूळ पाचव्यांदा तर चंद्रपूरचे हंसराज अहीर व यवतमाळच्या भावनाताई गवळी चौथ्यांदा लोकसभेत जात आहेत. चंद्रपूरमध्ये नरेश पुगलिया यांनी गेल्या पराभवाचा वचपा काढला. काँग्रेसने लोकसभेच्या इतिहासात असले पानिपत पाहिले नव्हते. दहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ नागपूरची जागा मिळाली होती. आज तोही गड गेला. विदर्भाकाठी काँग्रेस उरली नाही. १९९६ नंतर चार वेळा विलास मुत्तेमवार इथून विजयी होत आले. नितीन गडकरी यांनी त्यांना चारीमुंड्या चीत करताना मोठी लीड घेतली. सेक्युलर नागपुरात ५० वर्षांनंतर प्रथमच ब्राह्मण समाजाचा उमेदवार निवडून आला. सर्वात श्रीमंत उमेदवार प्रफुल्लभाई वाईट पद्धतीने हरले. नाना पटोले ‘जायंट किलर’ ठरले.