मुंबई: राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी राज्यमंत्री फौजिया खान यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असताना आता काँग्रेसनं खान यांच्या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपद, महत्त्वाची खाती न मिळाल्यानं राज्यसभेची अतिरिक्त जागा मिळावी, अशी काँग्रेसची आग्रही मागणी आहे. राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता त्यांचे ४ उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. राष्ट्रवादीनं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार आणि फौजिया खान यांना उमेदवारी दिल्यानं शिवसेना, काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली. मात्र आता काँग्रेसनं खान यांच्या जागेवर दावा सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दुय्यम मंत्रिपदं मिळाल्यानं किमान राज्यसभेत अतिरिक्त जागा देण्यात यावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजिद मेमन यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पुन्हा राज्यसभेच्या दोन जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच शरद पवार आणि फौजिया खान यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र आता काँग्रेसनं खान यांच्या जागेवर दावा केला आहे. या जागेवरुन सतीश चर्तुर्वेदींना राज्यसभेत पाठवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. काय आहे राज्यसभेच्या मतांचं गणित?राज्यसभेवर जाण्यासाठी उमेदवाराला ३८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या विधानसभेत शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४, तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. ही संख्या लक्षात घेता प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. याशिवाय अतिरिक्त मतांमुळे आणखी एक उमेदवारदेखील विजयी होईल. त्यामुळेच राष्ट्रवादीनं दोन उमेदवार दिले होते. शिवसेना, काँग्रेसची अतिरिक्त मतं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळतील, असं गणित यामागे होतं. मात्र काँग्रेसनं अधिकची जागा मागितल्यानं राष्ट्रवादीचं गणित फिस्कटण्याची चिन्हं आहेत.
आता 'त्या' जागेवर काँग्रेसचा नेम; राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा गेम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 10:39 IST
आता 'त्या' जागेवर काँग्रेसचा नेम; राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा गेम?
आता 'त्या' जागेवर काँग्रेसचा नेम; राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराचा गेम?
ठळक मुद्देकाँग्रेसला हव्या राज्यसभेच्या दोन जागा; राष्ट्रवादीसोबत वाद होण्याची चिन्हंराष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या जागेवर काँग्रेसचा दावामहत्त्वाची खाती दिली नाहीत, तर किमान खासदारकी द्या; काँग्रेसची मागणी