काँग्रेस नगरसेवकांचा राडा
By Admin | Updated: May 16, 2015 03:15 IST2015-05-16T03:15:09+5:302015-05-16T03:15:09+5:30
महापालिका मुख्यालयातच काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे आणि माजी गटनेते विक्रांत चव्हाण हे दोघे आपसात भिडल्याने भाजपापाठोपाठ

काँग्रेस नगरसेवकांचा राडा
ठाणे : महापालिका मुख्यालयातच काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे आणि माजी गटनेते विक्रांत चव्हाण हे दोघे आपसात भिडल्याने भाजपापाठोपाठ काँग्रेसमधील असंस्कृतीचे दर्शन ठाणेकरांना शुक्रवारी झाले. क्षुल्लक कारणावरून झालेल्या दोघांच्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्या वेळी दोघांचेही
समर्थक एकमेकांसमोर आल्यावर मध्यस्थीसाठी महापौर संजय मोरे पुढे सरसावले होते.
ठाणे महानगरपालिका प्रशासकीय आणि राजकीय अनागोंदी कारभारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. शुक्रवारी महापालिकेत सर्वसाधारण सभा होती. याचदरम्यान झालेल्या भोजनाच्या सुटीमध्ये सभागृहातून बाहेर आलेल्या किणे यांना चव्हाण यांनी एकेरी आवाज दिला. त्या वेळी किणे यांनीही त्यांना वर्णावरून आवाज दिला. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. या दोघांनी एकमेकांना लाथाही मारल्या. या वेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्यांचे भांडण सोडविले. तसेच, किणे यांना घेऊन ते सभागृहामध्ये गेले. त्यानंतर, हे दोघेही शांत झाले.
मात्र, त्यानंतर चव्हाण आपल्या प्रभागात गेले आणि आपल्या काही समर्थकांना घेऊन आले. किणे खाली येण्याची वाट ते पाहत होते. किणे आणि त्यांचे समर्थक समोर दिसताच दोन्ही गटांत हाणामारी झाली. या वेळी महापौर मोरे यांच्यासह बहुतेक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केली. किणे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.