गोव्यात काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी
By Admin | Updated: September 14, 2016 06:31 IST2016-09-14T06:31:01+5:302016-09-14T06:31:01+5:30
विरोधी काँग्रेस पक्षाकडे केवळ सात आमदारांचे संख्याबळ राहिलेले असताना ज्येष्ठ नेत्यांचेही पक्षाकडे लक्ष नसल्याने काँग्रेस विधिमंडळ गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

गोव्यात काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी
पणजी : विरोधी काँग्रेस पक्षाकडे केवळ सात आमदारांचे संख्याबळ राहिलेले असताना ज्येष्ठ नेत्यांचेही पक्षाकडे लक्ष नसल्याने काँग्रेस विधिमंडळ गट फुटीच्या उंबरठ्यावर आहे.
पक्षाचे दोन आमदार विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेससोबत राहणार नसल्याची कल्पना आल्यामुळे पक्षाचे निरीक्षक तथा केंद्रीय सचिव डॉ. चेल्लाकुमार हे मंगळवारी तातडीने गोव्यात दाखल झाले. काँग्रेसचे बहुतेक आमदार सध्या नाराज व अस्वस्थही आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपा हे दोन्ही पक्ष काँग्रेसच्या काही आमदारांना आॅफर्स देऊ लागले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या दोघा आमदारांनी पक्षास सोडचिठ्ठी देण्याचे ठरविल्यासारखी स्थिती आहे. विरोधकांनी एकत्र यावे, ही कल्पना प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो तसेच दिग्विजय सिंह हे अजून स्वीकारण्यास तयार नाहीत. तसेच काँग्रेस पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना पुढे आणत आहे, अशी नेत्यांमध्ये चर्चा आहे. निवडणूक तोंडावर आली, तरी व्यूहरचना ठरवली जात नसल्याने अनेक आमदार अस्वस्थ आहेत. पांडुरंग मडकईकर यांनी तर अलीकडेच दिल्लीत राहुल गांधी यांच्या भेटीवेळी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर ठेवली. मडकईकर यांच्या वाढदिवस सोहळ्यावेळी दहा मिनिटेदेखील प्रदेशाध्यक्ष व अन्य पदाधिकारी थांबले नाहीत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मडकईकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चेल्लाकुमार करतील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.