राय यांच्याविरोधात काँग्रेस करणार आंदोलन
By Admin | Updated: June 10, 2016 05:26 IST2016-06-10T05:26:24+5:302016-06-10T05:26:24+5:30
आंबेडकर घटनाकार नसल्याच्या कथित विधानाविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला

राय यांच्याविरोधात काँग्रेस करणार आंदोलन
मुंबई : इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे प्रमुख राम बहाद्दूर राय यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनाकार नसल्याच्या कथित विधानाविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसच्या मागासवर्गीय आघाडीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात राय यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.
राम बहाद्दूर राय यांनी मुलाखतीत डॉ. आंबेडकर यांचा घटनाकार म्हणून केला जाणारा उल्लेख चुकीचा असल्याचा दावा केला होता, असा आरोप गायकवाड यांनी केला. घटना केवळ वकिलांच्या हिताची असल्याचेही राय यांनी मुलाखतीत म्हटल्याचा दावा गायकवाड यांनी केला. राय यांची कला केंद्रातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार असल्याचेही गायकवाड म्हणाले. राय यांनी मात्र अशा प्रकारचा कोणताच खुलासा केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे बदनामीचे राजकारण असून ‘एडिटर्स गिल्ड’कडे तक्रार करणार असल्याचे राय यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)