काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर नाराज
By Admin | Updated: September 1, 2014 04:13 IST2014-09-01T04:13:03+5:302014-09-01T04:13:03+5:30
राष्ट्रवादीने ज्यादा जागांची मागणी करीत काँग्रेसची कोंडी केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याची भाषा करीत बॉम्बगोळा टाकला आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर नाराज
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा फड रंगू लागला असताना राष्ट्रवादीने ज्यादा जागांची मागणी करीत काँग्रेसची कोंडी केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याची भाषा करीत बॉम्बगोळा टाकला आहे.
मी स्वत: आघाडी तोडण्याच्या विरोधात आहे; मात्र राष्ट्रवादीची देहबोली काँग्रेसविरोधीच राहिली आहे असे आमच्या कार्यकर्त्यांना वाटते, असे ते पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले. गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादीसोबत आमची युती असून, ती तुटावी असे आम्हाला वाटत नाही. मात्र काँग्रेसचे तळागाळातील कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या सरकारमधील आणि निवडणुकीच्या काळातील भूमिकेवर नाराज आहेत.
काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे करण्याचे किंवा आडून विरोधकांना मदत करण्याचे राजकारण या पक्षाने खेळले आहे, अशी आमच्या पक्षकार्यकर्त्यांची भावना आहे, या शब्दांत त्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केल्याच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८८ पैकी १४४ जागांची मागणी करीत जागावाटपाचा तिढा निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही स्पष्टोक्ती केली.
मोदींनी गुजरात मॉडेलचा गवगवा केला. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या राजवटीत गुजरातपेक्षा जास्त विकास झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. याच कामगिरीच्या बळावर विधानसभा निवडणुकीत भरीव कामगिरी करीत लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती टाळता येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)