काँग्रेसनेच ‘कात्रज’ केल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोप
By Admin | Updated: June 8, 2016 02:28 IST2016-06-08T02:28:12+5:302016-06-08T02:28:12+5:30
ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा दारुण पराभव झाला.

काँग्रेसनेच ‘कात्रज’ केल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोप
अजित मांडके,
ठाणे- ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा दारुण पराभव झाला. डावखरेंनी शिवसेनेची सुमारे १०० मते फोडूनही १५१ मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याचे त्यांच्या जिव्हारी लागले असून पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने वेळोवेळी काँग्रेसला डिवचल्याचा फटका अकारण मला बसल्याची तक्रार त्यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.
काँग्रेसच्या स्थानिकच नव्हे, तर राज्यातील नेत्यांशी माझे सलोख्याचे संबंध असताना, अन्य पक्षांतही मैत्री जपलेली असताना कारण नसताना स्थानिक पातळीवर काँग्रेसला सतत अडचणीत आणण्याची केलेली खेळी मला भोवली आणि काँग्रेसने मला मदत केली नाही, असे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या राजकारणाच्या पद्धतीवर तोंडसुख घेतल्याचे कळते.
या पराभवाद्वारे मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाल्याची डावखरे यांची भावना झाली असून त्यांच्यासह त्यांचे समर्थकही नाराज असल्याने ठाणे महापालिकेच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.
विधान परिषदेच्या या महत्वाच्या निवडणुकीत उपसभापतीपदासारख्या महत्त्वाच्या पदावर राहिलेले डावखरे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. शिवसेनेसोबतच डावखरे यांची तयारी पाहता ही निवडणूक अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. परंतु मतदानाच्या दिवशी ही अपेक्षा फोल ठरली. वैध- अवैध मते वेगळी करीत असतांनाच डावखरेंचा पराभव झाल्याचे निश्चित झाले. त्यांचा १५१ मतांच्या फरकाने, दारुण पराभव झाल्याचे पुढील मोजणीत स्पष्ट झाले. या पराभवामागे जरी शिवसेनेचे जायंट किलर एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचे विश्लेषण केले जात असले आणि या पराभवाचे वेगवेगळ््या पातळीवर चिंतन सुरु असले, तरी पराभवाला मित्र पक्ष कॉंग्रेसच जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे काही कार्यक्रमानिमित्त ठाण्यात आले असता, त्यांनी डावखरे यांना कॉंग्रेसचा जाहीर पाठींबा असल्याचे सांगून निश्ंिचत केले होते. त्यावेळी डावखरे यांची उमेदवारी जाहीरही झाली नव्हती. नंतरही पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या दौऱ्यावेळी स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आक्रमक नेत्यांबाबत तक्रार केली होती, पण राणे यांनी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. परंतु वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी दिलेला दिलासा स्थानिक नेत्यांपर्यंत झिरपलाच नाही. पालिकेच्या राजकारणात वेळोवेळी कोंडी झाल्याने काही स्थानिक नेत्यांनीच त्यांच्या विश्वासाला तडा दिल्याची चर्चा आहे. तीच डावखरे यांनी पवार यांच्या कानी घातल्याचे बोलले जाते.
विधान परिषदेच्या घोडेबाजारात आणि जुन्या दोस्तीचा फायदा घेत डावखरे यांनी शिवसेनेची सुमारे १०० मते फोडल्याचे सांगितले जाते. त्याच मतांमुळे डावखरेंच्या मतांचा आकडा ४५० पर्यंत पोचला. उलटपक्षी कॉंग्रेसने आपली मते शिवसेनेच्या झोळीत टाकल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.
>सेनेतील अस्वस्थता उघड
चोख बंदोबस्त करून, योग्य मांडवली करूनही आपली मते फुटलीच कशी अशा ताणाखाली शिवसेनेचे नेते आहेत.
त्यांनी पक्षातील गद्दारांचा अभ्यास सुरू केला असून ही पक्षातील वेगवेगळ््या नेत्यांची नाराजी आहे, राणेंचा प्रभाव आहे की डावखरेंची मैत्री आहे, यावर लक्ष केंद्रित केले आहे.
अधिक मतांची बेगमी करून ठेवल्याने पक्षाला फार फटका बसला नसला तरी ठाणे पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील चलबिचल, अस्वस्थता उघड झाली आहे.
>आघाडीला तडे?
काँग्रेसबद्दलची नाराजी डावखरे यांनी पवार यांच्या कानी घातल्याने आघाडीच्या पक्षांतील शीतयुद्धाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या प्रचाराची धुरा नारायण राणे यांच्या खांद्यावर दिली आहे आणि राणे हे राष्ट्रवादीसोबत जावे या मताचे असल्याचे मानले जाते. मात्र स्थानिक नेत्यांचा राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या वर्तणुकीला विरोध आहे. त्यामुळे डावखरेंच्या पराभावाला निमित्त ठरल्याावरून आघाडीला तडे जाण्याची शक्यता काँग्रसेच्या गोटातून वर्तवली जात आहे.
उट्टे काढल्याची चर्चा : कॉंग्रेसने मागील विधान परिषद निवडणुकीचे उट्टे यानिमित्ताने काढल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. वसंत डावखरे हे निवडून आले तर ते पुन्हा उपसभापती होतील. ते पद पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील. सभापतीपदावरून आधी घडलेल्या नाट्यामुळे कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी या निवडणुकीनिमित्ताने कोंडी करण्याची संधी साधत शिवसेनेशी हातमिळवणी करुन डावखरेंना कात्रजचा घाट दाखविल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी याबाबत काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. दोन्ही काँग्रसेमधील या विसंवादाचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.