स्वतंत्र विदर्भावरून गोंधळ
By Admin | Updated: July 30, 2016 05:54 IST2016-07-30T05:54:37+5:302016-07-30T05:54:37+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याचा अशासकीय ठराव भाजपाचे खा. नाना पटोले लोकसभेत मांडणार असल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी

स्वतंत्र विदर्भावरून गोंधळ
- अतुल कुलकर्णी, मुंबई
स्वतंत्र विदर्भ राज्याचा अशासकीय ठराव भाजपाचे खा. नाना पटोले लोकसभेत मांडणार असल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या नावे घोषणाबाजी केली तर परिवहन मंत्री दिवाकर रावते व भाजपाच्या विदर्भातील आमदारांमध्ये खडाजंगी झाली. गदारोळात दोन्ही सभागृहांचे काम बंद पडले.
लोकसभेच्या कामकाज पत्रिकेवर आज खा. पटोल यांचा स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव होता. मात्र, इतर प्रश्नावरून गदारोळ झाल्याने हा प्रस्ताव लोकसभेच्या पटलावर मांडला गेलाच नाही. त्याआधीच या न मांडलेल्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. शिवसेनेचे नेते आक्रमक झाल्याने भाजपा सदस्यांशी चांगलीच खडाजंगी झाली. भाजपा-सेना आपापसात भिडल्याचे पाहून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, आ. जयंत पाटील यांनी विरोधकांना शांत बसण्यास सांगून दोघांमधील बेबनाव जाणीवपूर्वक स्पष्टपणे समोर येऊ दिला. सभागृह संपल्यावरही भाजपाचा एक गट स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, अशा घोषणा देत तर शिवसेनेचा गट अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत पायऱ्यांवर उतरला. या विषयावरून सेनेचा वाघ खरोखरीचा आहे की पेंढा भरलेला हे सोमवारी कळेलच, असा चिमटा काढत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगितले. स्वतंत्र विदर्भाचा एवढा ताठ बाणा असेलच तर विदर्भातील भाजपा आमदारांनी तत्काळ राजीनामे द्यावेत, असे आवाहन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
विधानसभेतही स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा गाजला. महाराष्ट्र तोडण्याची भाजपाची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत विखे-पाटील यांनी स्वतंत्र विदर्भाच्या ठरावाला विरोध केला. अजित पवार यांनी यावर सेनेची भूमिका काय, असे डिवचले. त्यावर सेनेचे आ. सुनील प्रभू यांनी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात भूमिका मांडताच भाजपाचे विदर्भवादी आमदार वेलमध्ये आले. गदारोळातच सभागृह तहकूब झाले.
स्वतंत्र विदर्भाबाबत सरकारचे मत काय?
लोकसभेत असा ठराव आल्याची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. पण लोकसभेतील कामकाजाचा मुद्दा विधान परिषदेत मांडता येतो का? असा मुद्दा विधान परिषदेत संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी उपस्थित केला.
त्यावर आम्हाला सरकारचे स्वतंत्र्य विदर्भाबाबतचे
मत हवे आहे असे म्हणत विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. त्यातच शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांच्या बाजूने आपले मत मांडले.
त्यामुळे झालेल्या गदारोळात दोनवेळा सभागृह तहकूब
झाले व शेवटी सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले.
स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे आमदार, खासदार यांनी आधी राजीनामे देऊन विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकून दाखवावी. ते बहुसंख्येने निवडून आले तर लोकभावना विदर्भ राज्याच्या बाजूने आहे हे दिसेल. विदर्भातील जनतेने त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठविले आहे. अशावेळी त्यांच्या भावनेचा अनादर करणे भाजपाला शोभत नाही. राज्याची शकले करण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही. - जयंत पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते
स्वतंत्र विदर्भाचा लोकसभेत ठराव मांडणे हा राज्याच्या अस्मितेला धक्का लावण्याचा भाजपाचा डाव आहे. १०५ जणांच्या हौतात्म्याचा हा अवमान आहे. राज्याच्या अखंडत्वाबद्दल राज्य सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आता सभागृहात मांडलीच पाहिजे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा