शिट्ट्या वाजवून काँग्रेसचा गोंधळ
By Admin | Updated: March 14, 2015 05:46 IST2015-03-14T05:46:01+5:302015-03-14T05:46:01+5:30
शिट्टी वाजवून सलग चौथ्या दिवशी पालिका महासभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर शिवसेनेचे नगरसेवक आज चक्क धावून गेले़ त्या

शिट्ट्या वाजवून काँग्रेसचा गोंधळ
मुंबई : शिट्टी वाजवून सलग चौथ्या दिवशी पालिका महासभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर शिवसेनेचे नगरसेवक आज चक्क धावून गेले़ त्यामुळे उभय पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार धक्काबुक्की सुरू झाली़ या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत होण्यापूर्वी राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादीच्या गटनेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला़ मात्र दहा मिनिटांच्या सभा तहकुबीनंतर सभागृहाच्या दुसऱ्या सत्रातही गोंधळ सुरुच राहिल्यामुळे महापौर स्नेहल आंबेकर यांनी काँग्रेसच्या आणखी सहा नगरसेवकांना निलंबित करीत सभा गुंडाळली़
सोमवारी निलंबित केलेल्या सदस्यांचे निलंबन रद्द करण्यास महापौर तयार नसल्याने काँग्रेसने आज चौथ्या दिवशीही घोषणाबाजी सुरु केली़ ‘दादागिरी नही चलेगी’, ‘महापौर हाय हाय’, अशा घोषणांबरोबच यावेळीस शिट्ट्या वाजवून पालिकेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न काँग्रेस सुरू ठेवला़ त्यामुळे काँग्रेसच्या सहा नगरसेवकांना महापौरांनी आज निलंबित केले़ मात्र सभागृहाबाहेर न जाता काँग्रेस सदस्यांचा गोंधळ वाढल्यामुळे शिवसेनेचे राजू पेडणेकर, मिराज शेख, अनिल सिंह हे नगरसेवक काँग्रेसचे प्रवीण छेडा यांच्यावर धावून गेले़ त्यामुळे या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली़ याचे रुपांतर हाणामारीत होईल, असे वाटत असतानाच समाजवादीचे गटनेते रईस शेख, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि राष्ट्रवादीचे हरुन खान यांनी हस्तक्षेप करीत त्यांना एकमेकांपासून वेगळे केले़ त्यामुळे हाणामारी टळली़ मात्र गोंधळ सुरुच राहिल्याने महापौरांनी सभा तहकूब केली़ (प्रतिनिधी)