केंद्र बदलल्याने गोंधळ

By Admin | Updated: March 2, 2017 02:18 IST2017-03-02T02:18:36+5:302017-03-02T02:18:36+5:30

मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांची केंद्रे अचानक बदलल्याने अनेक परीक्षार्थींवर आयत्या वेळी धावाधाव करण्याची वेळ आली

Confusion by changing the center | केंद्र बदलल्याने गोंधळ

केंद्र बदलल्याने गोंधळ

मनोहर कुंभेजकर,
मुंबई- मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांची केंद्रे अचानक बदलल्याने अनेक परीक्षार्थींवर आयत्या वेळी धावाधाव करण्याची वेळ आली. अनेक विद्यार्थ्यांना केंद्र शोधण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना बसला. आधीच प्रचंड वाहतूककोंडीने जेरीस आलेले असताना केंद्र बदलाने मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे यात अध्ययन अक्षम आणि अपंग विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.
निशिल घोडके या वाणिज्य शाखेतील सेरेब्रल पाल्सीग्रस्त, व्हीलचेअरवर असणाऱ्या व लेखनिकाच्या मदतीने पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्याचेही हाल झाले. या विद्यार्थ्याचे एम. के. संघवी कनिष्ठ महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आयत्यावेळी बदलून त्याला जुहू येथील कै. अनंत जनार्दन म्हात्रे कनिष्ठ महाविद्यालय येथे पाठवण्यात आले. त्या महाविद्यालयात लिफ्टची सोय नसल्याने व निशिल जिने चढण्यास असमर्थ असल्याने त्याचे पालक कोंडीत सापडले. पालकांनी महाविद्यालय प्रशासनाकडे त्याच्यासाठी आणि त्याच्यासारख्या अन्य विशेष विद्यार्थ्यांची तळमजल्यावर परीक्षा घेण्याची सोय करा, अशी विनंती केली. परंतु, किरकोळ कारणे सांगत ही विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर प्रचंड कष्ट घेऊन निशिलला चार जिने चढवून दुसऱ्या मजल्यावरील वर्गात जावे लागले.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि व सदर महाविद्यालय प्रशासनाच्या अपंग विद्यार्थ्यांप्रती असलेली अनास्था व असहिष्णुता लाजिरवाणी असल्याचे पालकांनी या वेळी बोलून दाखविले. शासनाच्या अपंगाना समान व सन्मानजनक वागणूक देण्याच्या व त्यांना मूळ प्रवाहात सामावून घेण्याच्या धोरणाला हा प्रकार हरताळ फासणारा असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.
>इतरांनाही त्रास
निशिलचे पालक जागरूक असल्याने हा प्रकार समोर आला. अनेक परीक्षार्थींचे असे हाल होत आहेत, पण ते समोर येत नाहीत, असे मतही काही शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अपंग विद्यार्थ्यांप्रती असलेली अनास्था व असहिष्णुता लाजिरवाणी असल्याचे पालकांनी या वेळी बोलून दाखविले.

Web Title: Confusion by changing the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.