पुणे: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी (एमई) अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल तब्बल 120 दिवसांनंतर जाहीर करण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे पुढील सत्राच्या परीक्षेचे अर्ज भरून घेण्यासाठी खूप कमी अवधी उरला आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या 16 मे रोजी सुरू होणार असताना विद्यापीठाने अद्याप महाविद्यालयांमार्फत विद्यार्थांकडून परीक्षा अर्जच भरून घेतले नाहीत. त्यामुळे विद्यार्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एमई प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचा निकाल सर्वात उशीरा जाहीर करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाने एमईची परीक्षा काही दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. परंतु,विद्यापीठाकडून परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला जात आहे. तसेच विद्यापीठाकडून पुनर्मुल्यांकनाचा निकाल जाहीर करण्याबाबत अद्याप प्रक्रिया सुरू केलेली नाही.त्यात येत्या 16 मे रोजी दुस-या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. तत्पूर्वी पुनर्मुल्यांकनाचा निकाल जाहीर होणे अवघड आहे.याबरोबरच पुढील सत्राचे परीक्षा अर्जही विद्यापीठाने भरून घेतले नाहीत. तसेच अर्ज भरून घेणार आहे किंवा नाही याबाबत कोणतेही परीपत्रक प्रसिध्द केले नाही. त्यामुळे आपली परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार का?, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ.व्ही.बी.गायकवाड याबाबत म्हणाले,विद्यापीठातर्फे एमई अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज यंदा नव्याने भरून घेतले जाणार नाहीत. विद्यापीठाकडे या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा अर्ज भरून घेण्याची आवश्यकता नाही.परीक्षा विभागातर्फे या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश पत्र (हॉल तिकिट)पाठविले जाणार आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे निकालही परीक्षेपूर्वी जाहीर करण्याची तयारी परीक्षा विभागाने सुरू केली आहे. परिणामी परीक्षा पुढे ढकलण्याची आवश्यकता भासणार नाही.निकाल लागला 30 दिवसांच्या आत विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ फाईन आर्ट (बीएफए) आणि बी.एस्सी. ॲनिमेशन या दोन परीक्षांचा निकाल परीक्षा विभागाने 30 दिवसांच्या आत जाहीर केला आहे. बीएफए अभ्यासक्रमास चार महाविद्यालयातील सुमारे 500 विद्यार्थी होते तर ॲनिमेशन अभ्यासक्रमास तीन महाविद्यालयांमधील 51 विद्यार्थी होते.
एमईच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
By admin | Updated: May 7, 2014 21:38 IST