पंतप्रधानांच्या समितीला विरोध हा देशाच्या सार्वभौमत्वावर घाला
By Admin | Updated: December 24, 2014 23:39 IST2014-12-24T23:39:56+5:302014-12-24T23:39:56+5:30
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली नाही तर तशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पण यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते

पंतप्रधानांच्या समितीला विरोध हा देशाच्या सार्वभौमत्वावर घाला
नागपूर : मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली नाही तर तशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. पण यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात त्रुटी राहिल्या. मात्र मुंबईच्या विकासात पंतप्रधानांनी लक्ष घालूच नये, असे जर कोणाला वाटत असेल तो देशाच्या सार्वभौमत्वारच घाला ठरेल, अशी घणाघाती टीका बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
मुंबईच्या प्रश्नावरील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
प्रस्तावावरील चर्चेदरम्यान समितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारला केंद्राच्या विविध प्राधिकरणांची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी अनेक वर्षे जातात हा आजवरचा अनुभव आहे. हा कालापव्यय टाळण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली तर हा त्रास दूर होईल. म्हणून समिती असावी अशी विनंती केली होती. या समितीमुळे मुंबई महापालिका किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही अधिकारावर अतिक्रमण होणार नाही, मात्र पंतप्रधानांनी मुंबईच्या विकासात लक्षच घालू नये असे जर कोणाला वाटत असेल तर तो देशाच्या सार्वभौमत्वावरच घाला ठरेल.
यासंदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्राचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही गोष्टीची पुरेशी माहिती न घेता त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची आपली सवय आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही चुकीची माहिती दिल्या गेली. त्यामुळेच त्यांच्या पत्रात त्रुटी राहून गेल्या. पवार हे कधीही चुकीचे मार्गदर्शन करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. झोपी गेलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करता येत नाही.मुंबईचा विकास शांघाय किंवा सिंगापूर या शहराप्रमाणे नव्हे तर मुंबईची ओळख कायम ठेवूनच हे शहर जागाचा मानबिंदू ठरेल अशा पद्धतीने विकसित करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (प्रतिनिधी)