गडचिरोली - भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित पक्षातील नेतृत्व बदलानंतर केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणूगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याने शस्त्रसंधीचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला होता. मात्र, नेतृत्व बदलानंतर पहिल्याच प्रस्तावावरून आता माओवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांत जुंपली आहे.
भूपतीच्या प्रस्तावाला माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीनेच विरोध दर्शविला आहे. तेलंगणा राज्य समिती प्रवक्ता जगन याने १९ सप्टेंबर रोजी पत्रक जारी करून भूपतीची भूमिका वैयक्तिक असल्याचा दावा केला. शस्त्र ठेवणार नाही तर संघर्ष करणार, असा इशाराही त्याने दिला. मे महिन्यात माओवादी नेत्यांनी पत्रक जारी करून सरकारला नक्षलविरोधी कारवाया थांबवण्याची विनंती केली होती. यामध्ये शस्त्रसंधीसह शांतीवार्ता प्रस्तावदेखील होता; परंतु सरकारने आधी शस्त्रे टाका, आत्मसमर्पण करा, नंतर चर्चा करू, ही भूमिका घेतली.
त्यानंतर छत्तीसगड, महाराष्ट्रासह दंडकारण्यातील नक्षल प्रभावित भागात सुरक्षा यंत्रणांच्या कारवाया अधिक आक्रमकपणे सुरू राहिल्या. २१ मे रोजी नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव ऊर्फ बसवराजूला छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने ठार केले. यानंतर अनेकांनी आत्मसमर्पणाची वाट निवडली. अलीकडेच नक्षल चळवळीतील सीपीआय महासचिवपदी जहाल नेता थिप्पारी तरुपती ऊर्फ देवजीची नियुक्ती झाली.