चार दिवसांपासून पाण्याविना रुग्णांचे हाल
By Admin | Updated: July 23, 2016 02:16 IST2016-07-23T02:16:46+5:302016-07-23T02:16:46+5:30
महापालिकेच्या उपनगरीय एम. टी. अग्रवाल रुग्णालयातील पाण्याचे दोन्ही पंप गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत.

चार दिवसांपासून पाण्याविना रुग्णांचे हाल
मुंबई: महापालिकेच्या उपनगरीय एम. टी. अग्रवाल रुग्णालयातील पाण्याचे दोन्ही पंप गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रुग्ण, त्यांचं नातेवाइकांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी या आठवड्यात कपड्यांची धुलाई होऊ शकली नाही. त्याचबरोबर फरशी पुसायलाही पाणी नसल्याने रुग्णालय परिसर कमालीचा अस्वच्छ बनला आहे. परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. गुरुवारी रात्री रुग्णालयात पाणी आले, पण शुक्रवारी पाणी पुन्हा गायब झाल्यामुळे रुग्ण आणखीनच त्रस्त झाले.
मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात रोजच्या रोज बाह्यरुग्ण विभागात सुमारे ३०० रुग्ण येतात. तर, सध्या रुग्णालयात सुमारे १०० हून अधिक रुग्ण दाखल आहेत. पण, सोमवारपासून रुग्णालयात पाणी वर चढत नसल्यामुळे टाक्या कोरड्या पडल्या होत्या. रुग्णालयातील जुन्या इमारतीतून वॉर्डबॉय पाणी भरत आहेत. वॉर्डमध्येदेखील पाण्याचा ठणठणाट आहे. या परिस्थितीत हात धुवायला तरी पाणी असावे, म्हणून वॉर्डबॉय पाणी भरतात. पण, हे पाणी पुरेसे नसल्याची खंत रुग्णालयाती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरुन पाणी विकत आणावे लागते. विकत आणलेले पाणी अन्य गोष्टींसाठी वापरले जाते. रुग्णालयात पाण्याचे दोन पंप आहेत. एक बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरा पंप बसवण्यात आला. तथापि, एक पंप गेल्या चार महिन्यांपासून बिघडलेला आहे. तरीही रुग्णालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रुग्णालयावर पाणीबाणीची वेळ ओढावली आहे. रुग्णालयात दर मंगळवारी सर्व कपड्यांची धुलाई होते. पण, या मंगळवारी पाणी नसल्यामुळे धुलाई झाली नाही. पाणीच नसल्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका वाढला असल्याची माहिती गोल्डी शर्मा यांनी दिली.
पाणी गुरुवारी रात्रीच आले. शुक्रवारीही होते. पंप बंद पडल्यावर तत्काळ टी वॉर्डला तक्रार नोंदवण्यात आली. आता पाण्याचा प्रश्न नाही. हा प्रश्न हा महापालिकेच्या वॉर्डचा आहे, रुग्णालय प्रशासनाचा नाही. काल टाक्यांमध्ये पाणी भरले गेले, असे रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
>पाण्याअभावी शस्त्रक्रिया रद्द
अग्रवाल रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून पाणी नसल्यामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. रुग्णांना आदल्या दिवशी दाखल करून उद्या शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले जाते. पण दुसऱ्या दिवशी पाणी नसल्यामुळे शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. शस्त्रक्रिया कधी करणार, याविषयी देखील रुग्णालय प्रशासन माहिती देत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून संतापाची भावना व्यक्त करण्यात आली.