विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

By Admin | Updated: February 6, 2017 02:27 IST2017-02-06T02:27:40+5:302017-02-06T02:27:40+5:30

आजच्या व नव्या पिढीपर्यंत विज्ञान पोहचवायचे असेल तर विज्ञानाच्या संकल्पना या केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये न राहता, त्यावर लेखन करणे आवश्यक आहे

The concept of science is not only in the curriculum | विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

जळगाव : आजच्या व नव्या पिढीपर्यंत विज्ञान पोहचवायचे असेल तर विज्ञानाच्या संकल्पना या केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये न राहता, त्यावर लेखन करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमामधून केवळ त्याचा अभ्यास होवू शकतो. मात्र त्याला विज्ञान कळू शकत नाही, असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत विज्ञानच नाही. तर सर्व विषय सोप्या पद्धतीने तयार करण्यात यायला हवे, अशीही अपेक्षा डॉ.पाटील यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद मुंबई व जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.
संमेलनाध्यक्ष तथा ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाहक अ.पां.देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.व्ही.सोमवंशी, जिल्हा कार्यवाहक दीपक तांबोळी, कोषाध्यक्ष शशिकांत नेहते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


तरुणांपर्यंत विज्ञान पोहोचणे आवश्यक - कुलकर्णी
संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, विज्ञानाचा प्रचार व्हावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेकडून विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन केले. दोन दिवसीय संमेलनात दर्दी विज्ञान प्रेमींची उपस्थित राहिली असली तरी ती बोटावर मोजण्याइतपतच होती. ज्या उद्देशाने विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्या उद्देशासाठी संमेलनात तरुणांची उपस्थिती महत्वाची होती. तरुणांपर्यंत विज्ञान पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.सुनिल गरुड यांनी मानले.

Web Title: The concept of science is not only in the curriculum