हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: May 16, 2016 11:29 IST2016-05-16T07:46:02+5:302016-05-16T11:29:24+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रज्ञा सिंह दोषमुक्त झाल्याचा आनंद व्यक्त करत हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नसल्याचं सामना संपादकीयमधून बोलले आहेत

हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 16 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रज्ञा सिंह दोषमुक्त झाल्याचा आनंद व्यक्त करत हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. सत्याची व न्यायाची बूज राखणे म्हणजे दबाव असेल तर आठ वर्षांपूर्वी ज्या बनावट पद्धतीने हिंदू दहशतवादाचा बागूलबुवा उभा केला गेला व निरपराध्यांना अडकवले गेले त्यास काय म्हणायचे? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात २१ मुसलमान तरुणांना निर्दोष म्हणून सोडले. आम्ही त्याचेही स्वागत करतो व प्रज्ञा सिंह दोषमुक्त झाल्याचाही आनंद व्यक्त करतो असे सांगत खरे आरोपी बहुधा पाकिस्तानातच पळाले असावेत अशी शंका ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट हा हिंदू दहशतवादाचा प्रकार असल्याची डरकाळी तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधार्यांनी फोडली. हिंदू कट्टरवादी मंडळींनी हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा बोगस तपास तेव्हाच्या ‘एटीएस’ने म्हणजे दहशतवादविरोधी पथकाने केला. साध्वी प्रज्ञा सिंह, ले. कर्नल पुरोहित यांच्यासह सात-आठ लोकांना या प्रकरणात नाहक गोवले. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. यानिमित्ताने हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्याची भरपाई कधीच होणार नाही. साध्वी प्रज्ञा सिंह व कर्नल पुरोहित यांना मालेगाव स्फोटात गोवले. हे सर्व लोक हिंदुत्ववादी किंवा ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पना मानणारे असू शकतात, पण हा काही देशद्रोहासारखा गुन्हा ठरू शकत नाही असंही मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
बरेच लोक हिंदुस्थानचे दुसरे पाकिस्तान करण्याचे मनसुबे पूर्ण करू इच्छित आहेत व राजकीय स्वार्थासाठी अशा लोकांना पाठबळ मिळत आहे, हाच देशद्रोह आहे! त्यामुळे हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही. राजकीय कट व राजकीय दबावाचाच हा एक भाग होता. धर्मांध मुसलमानांनी पाकिस्तानच्या मदतीने हिंदुस्थानात सुरू केलेला दहशतवाद मोडून काढायचे सोडून मुसलमानांना खूश करण्यासाठी हिंदू दहशतवादाची हवा निर्माण केली गेली असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
सामना संपादकीयमधील इतर महत्वाचे मुद्दे -
- बदनामी करणे हा गुन्हाच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटात नाहक अडकवून ज्यांचा छळ केला अशा सर्व लोकांनी तपास अधिकार्यांवर बदनामीचा गुन्हा दाखल करायला हवा
- दिल्लीतील काँग्रेसच्या गृहमंत्र्यांना व महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना हे कळले नाही की आपण अशा प्रकारे पाकिस्तानचे हात बळकट करीत आहोत. हिंदुस्थानने जेव्हा जेव्हा पाकिस्तानात आश्रयास असलेल्या दहशतवाद्यांची मागणी केली त्यावेळी आम्हाला आधी कर्नल पुरोहित द्या, अशी आव्हानाची भाषा पाकचे सरकार करू लागले. हे आयतेच कोलीत आपल्या काँग्रेजी राज्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या हाती दिले.
- हिंदुस्थानातील दहशतवादी कृत्ये पाकिस्तान घडवत नसून त्यामागे हिंदुत्ववादी संघटनाच असल्याच्या उलट्या बोंबा पाकडे मारू लागले व हे सर्व मालेगाव स्फोटातील राजकीय हस्तक्षेपांमुळे घडले.
- राजकीय मालकांना खूश करण्यासाठीच या तपासाची आखणी झाली. दिल्लीत चिदंबरम, महाराष्ट्रात शरद पवार, आर. आर. पाटील यांच्यासारख्या लोकांनी ‘मुसलमानांना टार्गेट केले जात आहे’ असे छाती पिटून सांगितले व दहशतवादाला भगवा रंग देऊन ते मोकळे झाले.
- यूपीए सरकारने राजकीय फायद्यासाठी तपास यंत्रणांवर दबाव आणला व हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुढे आणून निरपराध्यांचा छळ केला. हे पापच होते व ज्यांनी ते केले त्यांचे अस्तित्वच नष्ट झाले हे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.
- कर्नल पुरोहित यांनी कश्मीर खोर्यात अतिरेक्यांशी लढा दिला, जीवाची बाजी लावली, अशा देशप्रेमी पुरोहितांच्या घरात तपास अधिकार्यांनी स्वत:च आरडीएक्स ठेवून त्यांना अडकवले. त्यांच्याविरोधात खोटे पुरावे उभे केले. कर्नल पुरोहित यांना अपमानास्पद वागवून अत्याचार केले त्या सर्व पोलीस अधिकार्यांची नावे सार्वजनिक करून त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे.
- खटला चालविण्याइतके पुरावेच नाहीत असे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. मग कोणताही पुरावा नसताना हे सर्व लोक आठ वर्षे तुरुंगात का सडत राहिले? काँग्रेस व त्यांची पिलावळ आता याविरोधात कोल्हेकुई करील