कॉम्रेडची अखेर
By Admin | Updated: February 21, 2015 02:20 IST2015-02-21T02:19:10+5:302015-02-21T02:20:01+5:30
गोविंद पानसरे कालवश : आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार

कॉम्रेडची अखेर
कोल्हापूर/मुंबई : महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, गोरगरीब, श्रमिक-कष्टकरी व कामगारांचे पुढारी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (वय ८१, रा. प्लॉट नंबर १७, आयडियल गृहनिर्माण सोसायटी, सागरमाळ, कोल्हापूर) यांची गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज शुक्रवारी रात्री १०.४५ मिनिटांनी थांबली. मुंबईतील ब्रीच कॅँडी रुग्णालयात फुप्फुसात रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाले. गेल्या सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) त्यांच्यावर सागरमाळ परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यांचे पार्थिव आज, शनिवारी कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेलाही हुंदका आवरला नाही. ‘गोरगरिबांना आधार देणारे अण्णा गेले,’ असा टाहो त्यांनी फोडला.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून पानसरे व त्यांच्या पत्नी उमा (वय ६७) यांच्यावर हल्ला केला होता. ही घटना पानसरे यांच्या सागरमाळ येथील निवासस्थानापासून सत्तर फुटांवर घडली होती. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर त्याच मोटारसायकलवरून पसार झाले. त्यांना आजअखेर अटक झालेली नाही. तोपर्यंत अण्णांचा मृत्यू झाल्याने लोकांना धक्का बसला. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी पानसरे यांच्या मृत्यूची माहिती दिली. शवविच्छेदन करून विमानाने त्यांचे पार्थिव कोल्हापूरला आणण्यात येणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागला नसताना त्याच विचारांचे जाहीरपणे समर्थन करणारे व त्यांच्या चळवळीला बळ देणारे
महाराष्ट्रातील प्रमुख नेते अशी पानसरे यांची ओळख होती. पानसरे दाम्पत्यावर येथील अॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते; परंतु गुरुवारी दुपारनंतर त्यांचा कृत्रिम श्वासोच्छ्वास काढल्यानंतर ते अस्वस्थ झाले. म्हणून पुढील उपचारासाठी आज शुक्रवारी दुपारीच खास एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅँडी रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची कन्या स्मिता सातपुते यांनी अण्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर काही अवधीतच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली आणि सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला. कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र आले व त्यांनी ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. ज्या मंडपात आज, शनिवारी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन होणार होते, त्याच मंडपात आता पानसरे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सर्वव्यापी कार्य..
पानसरे हे जरी कम्युनिस्ट पक्षाचे नेते असले तरी गेल्या दहा वर्षात मुख्यत: मुलगा अवि पानसरे यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे काम अधिक सर्वव्यापी झाले होते. राजकारणापेक्षा ते सामाजिक कार्यात अधिक अग्रभागी राहिले. कोल्हापुरातील अशी एकही चळवळ नाही की जिच्याशी पानसरे यांचा संबंध आलेला नाही. एकाचवेळेला ते टोल आंदोलानात पुढे होते. त्याचवेळेला शाहू विचारांची प्रस्तुतता या विषयावर प्रबोधन करत राज्यभर फिरत होते. त्याचवेळेला कोरडवाहू शेतीच्या प्रश्नांवर पुस्तिका काढत होते. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर त्यांचा कोल्हापुरात मोठा सत्कार करण्याचे त्यांनी नियोजन केले होते. परंतु ते नियतीने सत्यात आणू दिले नाही.
मला कोण
कशाला मारेल रे...
अण्णांना धमकीची पत्रे आली होती. तुमचा दाभोलकर करू, असेही त्यात म्हटले होते. परंतु अण्णांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांना त्याबद्दल कुणीतरी विचारले की, त्यांचे उत्तर असे ‘मला कोण कशाला मारेल रे...?’ तुमच्या-माझ्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या मनांतही तोच प्रश्न होता. कुणाशी फारसे मोठ्यानेही न बोलणाऱ्या या नेत्यास गोळ््या घालून ठार मारावे हेच मनाला खूप वेदना देणार आहे.
दुपारीच पाल चुकचुकली...
पानसरे यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती गेले दोन दिवस देण्यात येत होती. त्यामुळे अण्णा या हल्ल्यातून नक्कीच बाहेर येतील, अशी आशा सगळ्यांनाच वाटत होती. अण्णांनी ज्या गोरगरीब व फाटक्या माणसांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या सगळ््यांच्या सदिच्छा या हल्ल्यातून त्यांना नक्की बाहेर काढतील अशी भाबडी आशा सगळ््यांचीच होती; पण ती खोटी ठरली. शुक्रवारी दुपारी त्यांना मुंबईला हलवितानाच लोकांच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली होती. त्यांची प्रकृती सुधारत आहे तर मग तुम्ही त्यांना मुंबईला का हलविता अशी विचारणा कार्यकर्ते करत होते. त्यांच्या मनांतील शंका रात्रीचा अंधार गडद होण्यापूर्वीच खरी ठरली.
कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला
दरम्यान, शनिवारी रात्री ‘कॉ. गोविंद पानसरे अमर
अमर रहे,’ अशा घोषणा दसरा चौकातील शाहू स्मारक भवन मैदानावर उभ्या करण्यात आलेल्या मंडपात कार्यकर्त्यांनी केल्या. पानसरे यांची प्राणज्योत मालवली हे समजताच कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा
बांध फुटला.
सकाळी साडेदहा वाजता कोल्हापुरात पार्थिव येणार
दसरा चौकातील मैदानावर आज, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता गोविंद पानसरे यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयात रात्री पावणेदहाला प्रकृती खालावली
फुप्फुसात रक्तस्त्राव झाल्यामुळे मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात निधन
पाच दिवसांपासून सुरु होती मृत्यूशी झुंज
शनिवारी सकाळी साडेदहाला पार्थिव मुंबईहून कोल्हापूरला आणणार
दसरा चौकात अंत्यदर्शनासाठी दोन तास पार्थिव ठेवण्यात येणार
१९५२ पासून कम्युनिस्ट पक्षाचे
सक्रिय सदस्य
अंधश्रध्दा निर्मूलन, कोल्हापूरचे टोल आंदोलन, कामगार, फेरीवाले, घरेलू कामगारांच्या हक्कांसाठी झगडणारा लढाऊ नेता
असा माणूस होणे नाही...
पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुखात गेल्या पाच दिवसांपासून एकच सदिच्छा होती. ‘अण्णा यातून
वाचले पाहिजेत हो...’ कारण असा माणूस पुन्हा होणे नाही..अशी लोकभावना होती. नियतीनेही ती खरी होऊ दिली नाही.
विमानाने पार्थिव कोल्हापुरात आणणार
गोविंद पानसरे यांचे पार्थिव आज, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता खास विमानाने कोल्हापुरात आणले जाणार आहे. त्यानंतर दसरा चौक येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या विविध मार्गांवरून अंत्ययात्रा काढण्यात येणार असून पंचगंगा मुक्तिधामवर अंत्यसंस्कार केले जातील.
कष्टकऱ्यांच्या नेत्याला मुकलो
महाराष्ट्र मोठ्या नेत्याला मुकला आहे. गोविंद पानसरे यांच्या निधनाने महाराष्ट्राबरोबरच देशाचीही मोठी हानी झाली आहे. श्रमिक आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या कामाची महाराष्ट्र सतत दखल घेईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी घेतले पार्थिवाचे दर्शन
रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन पानसरे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
५कोणत्याही धार्मिक कार्याशिवाय अंत्यसंस्कार
कॉ. गोविंद पानसरे यांचे पार्थिव विशेष विमानाने कोल्हापुरात आल्यानंतर प्रथम दसरा चौक येथे भाकपच्या राज्य अधिवेशनानिमित्त उभारण्यात आलेल्या मंडपात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेथून अंत्ययात्रा निघणार असून पक्षाच्या बिंदू चौक कार्यालयात काही काळ पार्थिव ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी पक्षाचा ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल. तेथून पंचगंगा नदीघाटावर कोणत्याही धार्मिक विधीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात येतील.