‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Updated: February 23, 2015 02:37 IST2015-02-23T02:37:36+5:302015-02-23T02:37:36+5:30

कष्टकरी-कामगारांचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुकारलेल्या रविवारच्या बंदला राज्यात

Composite response to 'Maharashtra Bandh' | ‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद

‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद

मुंबई : कष्टकरी-कामगारांचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुकारलेल्या रविवारच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरमध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह पुरोगामी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला होता.
कोल्हापुरातील सर्व संस्था-संघटना, तालीम व तरुण मंडळे, उद्योजक-व्यापारी, फेरीवाले आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. बंदकाळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील विविध तरुण मंडळांनी फलक लावून पानसरेंच्या हत्येचा निषेध नोंदविला.
पुण्यात विविध कार्यक्रम
पुणे शहर व जिल्ह्यात बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी केलेली आंदोलने आणि कार्यक्रमांव्यतिरिक्त बंदचे स्वरूप संमिश्र स्वरूपाचे होते.
विदर्भात निदर्शने
च्विदर्भात नागपूर, भंडारा, यवतमाळ, गडचिरोलीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नागपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसह पुरोगामी विचारांचे पक्ष आणि संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. दुपारी झाशी राणी चौकात निदर्शने करण्यात आली. यवतमाळमध्ये बसस्थानक चौकात सकाळी रास्ता रोको करण्यात आला. वणी शहरातही दुकाने बंद होती. गोंदियात भाकपच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. त्यानंतर शोकसभा झाली.
नाशिकमध्ये धरपकड : नाशिकमध्ये शालिमार परिसरात दुकाने बंद करण्यास गेलेले डाव्या पक्षांचे नेते व सुमारे १०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली़ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाले.
सोलापूरमध्ये शोकसभा : सोलापूरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा झाली. विवेकवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास एक पानसरे गेले तर हजार तयार होतील, असे मत यावेळी व्यक्त झाले.

Web Title: Composite response to 'Maharashtra Bandh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.