अकोल्यातील धान्य घोटाळ्याचा तपास पूर्ण
By Admin | Updated: June 30, 2015 02:53 IST2015-06-30T02:53:32+5:302015-06-30T02:53:32+5:30
केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील धान्य घोटाळा प्रकरणाचा दिल्ली येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाकडून गत आठवडाभरापासून सुरू असलेला

अकोल्यातील धान्य घोटाळ्याचा तपास पूर्ण
अकोला : केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील धान्य घोटाळा प्रकरणाचा दिल्ली येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाकडून गत आठवडाभरापासून सुरू असलेला तपास सोमवारी पूर्ण करण्यात आला.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अकोला जिल्ह्यात भारतीय खाद्य निगममार्फत (एफसीआय) केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून धान्याचे वितरण करण्यात येते. त्यामध्ये अकोल्यातील देशमुख फैलमधील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातील धान्यसाठ्यात कोट्यवधी रुपयांच्या धान्यसाठ्याची अफरातफर झाल्याचे प्रकरण मार्च २०१४मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणात केंद्रीय वखार महामंडळाचे अकोल्यातील तत्कालीन व्यवस्थापक रामण्णा राव आणि चार कर्मचाऱ्यांविरुद्ध रामदासपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. वर्षभरानंतर या धान्य घोटाळ्याचा तपास करण्यासाठी डी.जी. मीणा यांच्या नेतृत्वात दिल्ली येथील ‘सीबीआय’च्या चार अधिकाऱ्यांचे एक पथक अकोल्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ‘एफसीआय’मार्फत केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामात उपलब्ध झालेला धान्यसाठा, उपलब्ध धान्यसाठ्यातून करण्यात आलेले वितरण आणि झालेली अफरातफर यासंबंधीची सविस्तर माहिती घेऊन, ‘सीबीआय’च्या पथकाकडून सखोल तपास करण्यात आला. तपासानंतर दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)
केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामात झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास करण्यासाठी २२ ते २६ जून या काळाकरिता ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांचे पथक अकोला दौऱ्यावर आले होते. मात्र, तपास पूर्ण झाला नसल्याने, सीबीआय पथकाकडून तीन दिवस (२९ जूनपर्यंत) मुक्काम वाढविण्यात आला. त्यामुळे धान्य घोटाळा मोठा असल्याने तपास पूर्ण करण्यासाठी ‘सीबीआय’ला मुक्काम वाढवावा लागल्याचे स्पष्ट होत आहे.