मुंबई मेट्रो -३, नागपूर मेट्रो मुदतीत पूर्ण करा
By Admin | Updated: August 15, 2015 00:23 IST2015-08-15T00:23:04+5:302015-08-15T00:23:04+5:30
मुंबई मेट्रो -३ तसेच नागपूर मेट्रोसाठी भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती देऊन दोन्ही प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.

मुंबई मेट्रो -३, नागपूर मेट्रो मुदतीत पूर्ण करा
मुंबई : मुंबई मेट्रो -३ तसेच नागपूर मेट्रोसाठी भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती देऊन दोन्ही प्रकल्प मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.
मंत्रालयातील सीएम वॉर रूममध्ये या संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
बैठकीत मुंबई मेट्रो-३ तसेच नागपूर मेट्रोच्या कामासाठी करावयाच्या भूसंपादनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मुंबई मेट्रो -३ चा कार डेपो, स्टेशन यांच्या कामासाठी ७४ हेक्टर जागा लागणार आहे. त्या संदर्भातील सादरीकरण एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, जमीन संपादनाबाबतच्या अडचणी तत्काळ निकाली काढाव्यात व जमीन एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करावी. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब होणार नाही. या प्रकल्पांतर्गत जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची नियमित बैठक घेण्यात यावी. त्यांना पुर्नवसनाबाबत वेळच्या वेळी माहिती दिल्यास प्रकल्पाला असलेला विरोध मावळण्यास मदत होईल.