खडसेंविरुद्ध विनयभंगाची तक्रार; जळगाव, मुंबईत फिर्याद : अंजली दमानिया यांच्याबद्दल अपशब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 03:38 IST2017-09-07T03:38:10+5:302017-09-07T03:38:51+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

खडसेंविरुद्ध विनयभंगाची तक्रार; जळगाव, मुंबईत फिर्याद : अंजली दमानिया यांच्याबद्दल अपशब्द
मुंबई/जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, दमानिया यांचे सर्व आरोप खडसे यांनी फेटाळले असून कोणाबद्दलही अपशब्द वापरले नाहीत, असा खुलासा केला आहे.
२ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथे खडसे यांचा वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी केलेल्या विधानावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. खडसे यांनी आपल्याबद्दल अत्यंत अशोभनीय व असभ्य भाषा वापरली असून त्यांच्याविरुद्ध कलम ३५४ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
याबाबत दमानिया यांनी मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केली आहे. सोबतच खडसे यांच्या ‘त्या’ भाषणाची क्लीपही पुरावा म्हणून पाठविली आहे.
दरम्यान, खडसे यांनी या आरोपांचे खंडण केले आहे. माझे शेतीपासूनचे उत्पन्न वाढले. आंब्याची झाडे, त्यांचा आकार वाढला. तसेच दमानियांच्या शेतातील उत्पन्नही वाढले असेल, असे मी बोललो. यात एक महिला म्हणून त्यांना हिणवण्याचा वा त्यांच्याविषयी अश्लील बोलण्याचा माझा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिले.