मुख्यमंत्र्यांविरुद्ध आयोगाकडे तक्रार
By Admin | Updated: October 7, 2015 05:31 IST2015-10-07T05:31:07+5:302015-10-07T05:31:07+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून मतदारांची दिशाभूल व निवडणूक

मुख्यमंत्र्यांविरुद्ध आयोगाकडे तक्रार
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लागलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून मतदारांची दिशाभूल व निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे मंगळवारी दाखल केली.
शिष्टमंडळात प्रदेश प्रवक्ते रत्नाकर महाजन, सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रवक्ते सचिन सावंत आदींचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांची ती निवडणूक प्रचार सभा होती. तेथे निवडणूक अधिकारीदेखील हजर होते. त्यांनी स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित होते. त्यांनी ती न केल्याने काँग्रेसने आज तक्रार दाखल केली आहे. (विशेष प्रतिनिधी)
६५०० कोटींच्या आराखड्याची घोषणा
३ आॅक्टोबर रोजी डोंबिवली जीमखान्याच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेमध्ये कल्याण-डोंबिवली शहरासाठी ६५०० कोटी रूपयांचा आराखडा तयार केल्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी मतदारांना प्रलोभन दिले व निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले.
त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयुक्तांकडे केली. त्यावर या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त सहारिया यांनी शिष्टमंडळाला दिले.
एकीकडे आर्थिक तूट असल्याचे कारण सांगून राज्य सरकार
५ टक्के विक्रीकर वाढवते व पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सरसकट २ रुपये वाढ करते तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोट्यवधींच्या पॅकेजची घोषणा केली जाते, ही मतदारांची फसवणूक व दिशाभूल असल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाने केला.