‘एआयबी नॉकआऊट’ विरोधात तक्रारी
By Admin | Updated: February 3, 2015 11:51 IST2015-02-03T11:51:42+5:302015-02-03T11:51:42+5:30
अश्लिल जोक्स, शेरेबाजी आणि व्यक्तीकेंद्रीत टीपण्णीचा भडीमार असलेल्या एआयबी नॉकआऊटस या शोविरोधात शहरातल्या विविध पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी आल्या आहेत.
‘एआयबी नॉकआऊट’ विरोधात तक्रारी
अश्लिल विनोद : कलाकारांचे बीभत्स हावभाव
मुंबई : अश्लिल जोक्स, शेरेबाजी आणि व्यक्तीकेंद्रीत टीपण्णीचा भडीमार असलेल्या एआयबी नॉकआऊटस या शोविरोधात शहरातल्या विविध पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींमध्ये चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, या शोचे सूत्रसंचालक अभिनेते अर्जून कपूर, रणवीर सिंग आणि शोच्या आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२० डिसेंबरला वरळीत हा शो झाला. यात जोहरसह अर्जून, रणवीर यांनी सुमारे चारेक हजार श्रोत्यांसमोर अत्यंत अश्लिल, भाषेत, बीभत्स हावभाव व हातवारे करून जोक्स सांगितले, उपहासात्मक टीपण्णी केली. श्रोत्यांमध्ये बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री अलीया भटट, दिपीका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. विशेष म्हणजे तरूणाई आणि महिलांची उपस्थिती श्रोत्यांमध्ये अधिक होती. जोहर, रणवीर, अर्जून यांच्या अश्लिलतेवर सारेच टाळया, शिटटया वाजवून दाद देताना दिसले.
या शोमधील तीन चित्रफिती यूटयूबवरून सर्वत्र प्रसारीत झाल्या. गेल्या दोनेक दिवसांमध्ये सोशलमिडीच्या माध्यमातून बहुतांश सर्वसामान्यांनी त्या ऐकल्या.
याविरोधात ब्राम्हण सेवा संस्थानचे अध्यक्ष अखिलेश तिवारी यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार जोहर, अर्जून, रणवीर यांच्यासह शोच्या आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जावी जेणेकरून अशाप्रकारचे बीभत्स कार्यक्रम जाहीररित्या करू पाहाणाऱ्यांना चाप बसेल. या शोमधून भारतीय संस्कृतिची, महिलांची विटंबना करण्यात आली आहे. तरूणांच्या मनावर या शोमुळे वाईट परिणाम होऊ शकतो, असेही तिवारी तक्रारीत नमूद करतात.
तिवारी यांच्याकडून लेखी तक्रार मिळाली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रसन्ना मोरे यांनी लोकमतला सांगितले.
पोलीस दलाचे प्रवक्ते आणि धनंजय कुलकर्णी यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार हा शो ताडदेव पोलीस ठाण्याच्या हददीत पार पडला. त्यांनतर साकिनाकासह वांद्रे व माहिम पोलीस ठाण्यात लेखीतक्रारी
आल्या आहेत. मात्र अद्याप गुन्हा नोंद नाही. याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे त्यानी स्पष्ट के ले. (प्रतिनिधी)
विनोद तावडेंनी दिले चौकशीचे आदेश
‘एआयबी नॉक आऊट’ या पहिल्यावहिल्या भारतीय डार्क कॉमेडीवरून वाद निर्माण झाला आहे. दिग्दर्शक करण जोहरसह, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांनी सादर केलेला कार्यक्रम एकीकडे युट्युबवर हिट ठरत असतानाच कार्यक्रमातील असभ्य भाषा आणि विनोदावरून तीव्र टीकाही होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची चौकशी करण्याचे आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.