भुजबळ कुटुंबीयांविरोधात एसीबीकडे तक्रार
By Admin | Updated: November 21, 2014 02:42 IST2014-11-21T02:42:31+5:302014-11-21T02:42:31+5:30
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व आमदार छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांनी पदाचा गैरवापर करून सुमारे अडीच हजार कोटींची बेहिशेबी

भुजबळ कुटुंबीयांविरोधात एसीबीकडे तक्रार
मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व आमदार छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांनी पदाचा गैरवापर करून सुमारे अडीच हजार कोटींची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली.
दमानिया व सामाजिक कार्यकर्ते संजय खांडेकर यांनी गुरुवारी वरळी येथील मुख्यालयात महासंचालक प्रवीण दीक्षित यांची भेट घेऊन भुजबळ, पुत्र व आमदार पंकज भुजबळ, पुतणे व माजी खासदार
समीर भुजबळ यांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा, मंत्रिपदाचा गैरवापर करून बेहिशेबी
मालमत्ता कशी गोळा केली, हे पुराव्यानिशी सादर केल्याची माहिती मिळते.
भुजबळ कुटुंबाच्या नावे मुंबईसह महाराष्ट्र, देशात व परदेशात असलेल्या मालमत्तांची यादी दमानिया यांनी एसीबीला दिली. तसेच या मालमत्ता भुजबळ यांच्याच आहेत, हे स्पष्ट करणारे पुरावेही त्यांनी तक्रारीसोबत जोडले आहेत. भुजबळ कुटुंबाने एकूण २ हजार ६५३ कोटींची बेहिशेबी मालमत्ता गोळा केली. त्यापैकी १३३ कोटींच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागलेले नाहीत. मात्र उर्वरित २५२० कोटींच्या मालमत्तांचे पुरावे मिळवून
ते एसीबीला दिले आहेत, असे दमानिया यांनी 'लोकमत'ला सांगितले.
भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज व पुतणे समीर यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता, मनी लॉण्डरिंग आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदवून सखोल तपास करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
दमानिया यांच्या तक्रारीवर नियमांप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे
महासंचालक दीक्षित यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)