क्विक सर्व्हिसेसला भरपाईचे आदेश
By Admin | Updated: June 27, 2016 02:28 IST2016-06-27T02:28:10+5:302016-06-27T02:28:10+5:30
वॉरंटी कालावधीत फ्री व्हिजिट असूनही त्यासाठी चार्जेस आकारणाऱ्या क्विक सर्व्हिसेसने ग्राहकाला ७ हजार नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

क्विक सर्व्हिसेसला भरपाईचे आदेश
ठाणे : वॉरंटी कालावधीत फ्री व्हिजिट असूनही त्यासाठी चार्जेस आकारणाऱ्या क्विक सर्व्हिसेसने ग्राहकाला ७ हजार नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.
ठाणे येथे राहणारे उदय कुलकर्णी यांनी १४ नोव्हेंबर २००७ रोजी १४ हजारांची वॉशिंग मशीन विकत घेतली. त्यानंतर, त्यांनी क्विक सर्व्हिसेसकडून आॅक्टोबर २०१३ ते २०१४ या कालावधीसाठी ३२४० रुपये देऊन होम केअर प्लान घेतला. जून २०१४ मध्ये कुलकर्णी यांच्याकडील मशीन पूर्णत: ब्रेकडाऊन झाली. त्यांनी क्विक सर्व्हिसेसला त्याची माहिती दिल्यावर त्यांच्या टेक्निशियनने घरी येऊन मशीनची तपासणी केली. सुटा भाग खराब झाला असून बदलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आणि व्हिजिट चार्ज ३५० रुपये मागितले. कुलकर्णी यांनी देण्यास नकार दिला, तर चार्ज न दिल्यास पुढील वेळी तक्रार घेतली जाणार नाही, असे त्याने सांगितले. त्यामुळे त्यांनी टेक्निशियनला ३०० रुपये दिले. मात्र, बेकायदेशीरपणे चार्जेस आकारल्याचे सांगून ती रक्कम परत देण्याची मागणी सर्व्हिसेसकडे केली. मात्र, कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, अखेर कुलकर्णी यांनी क्विक सर्व्हिसेसविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली.
कागदपत्रांची पडताळणी केली असता होम केअर प्लानसाठी क्विक सर्व्हिसेसला रक्कम भरल्याची तसेच वॉशिंग मशीनच्या व्हिजिट चार्जेसची पावती आहे. तर, प्लानच्या ब्रोशरमधील अटी आणि शर्तींनुसार वॉॅरंटी कालावधीत फ्री व्हिजिट नमूद आहे. त्यामुळे वॉरंटी कालावधीत चुकीच्या चार्जेसची आकारणी करून फसवणूक करणाऱ्या क्विक सर्व्हिसेसने कुलकर्णी यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.