काश्मीर-बलुचिस्तानची तुलना चुकीची- अशोक श्रीवास्तव

By Admin | Updated: September 8, 2016 06:14 IST2016-09-08T06:14:08+5:302016-09-08T06:14:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्यापासून, काश्मीर आणि बलुचिस्तान यांची तुलना केली जात आहे

The comparison of Kashmir-Balochistan is wrong: Ashok Shrivastav | काश्मीर-बलुचिस्तानची तुलना चुकीची- अशोक श्रीवास्तव

काश्मीर-बलुचिस्तानची तुलना चुकीची- अशोक श्रीवास्तव

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्यापासून, काश्मीर आणि बलुचिस्तान यांची तुलना केली जात आहे, ती अकारण आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी केले. मुंबई प्रेस क्लबद्वारे आयोजित केलेल्या बलुचिस्तानवरील चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. मात्र इतर वक्त्यांच्या भाषणांमध्ये भारत पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा संदेश जगभरात गेल्याचा सूर व्यक्त झाला.
या वेळेस श्रीवास्तव म्हणाले, ‘काश्मीर किंवा जगातील कोणत्याही संघर्ष चालू असलेल्या प्रदेशात, मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांचा उल्लेख किंवा तशा घटनांच्या नोंदी अटळ आहेत. मात्र, म्हणून बलुचिस्तान आणि काश्मीर यांची तुलना करणे अयोग्य वाटते. दोन्ही प्रदेशांचा, त्यांच्या प्रश्नांचा इतिहास आणि वर्तमान वेगवेगळा आहे. त्यांच्या प्रश्नांची पार्श्वभूमीही वेगळी आहे. त्यामुळे त्या दोन प्रश्नांना जोडू नये. बलुचिस्तानचा मुद्दा भारताने उचलल्यावर, पाकिस्तानात भारताविरोधी मत एकत्र होईल, असे मुळीच वाटत नाही. त्याचप्रमाणे, बलुचिस्तानात निवडून आलेले सरकार अस्थिर होईल, असे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण तेथे निवडणुका मुळीच निष्पक्ष पद्धतीने होत नाहीत. याउलट काश्मीर खोऱ्यामध्ये निवडणुका फारच चांगल्या पद्धतीने राबविल्या गेल्या आहेत. भारताने बलुचिस्तानातील मानवाधिकाराचा मुद्द्यावर मत व्यक्त करणे काहीच गैर नाही. श्रीवास्तव यांच्या या मताच्या अगदी विरोधी मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले. बलुचिस्तान हा इराण आणि अफगाणिस्तानातही पसरला आहे. भारताने इराणमधील चाबहर बंदर विकसित करण्यास घेतले आहे, ते पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून केवळ ७० किमी दूर आहे. त्यामुळे इराण आणि भारताच्या संबंधांवरही याचा परिणाम होऊ शकतो. जतीन देसाई यांनी बलुचिस्तानच्या इतिहासाचा आणि राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेताना, बलुचस्तिान हा संपन्न प्रदेश आहे, पण बलुच लोक गरीब आहेत,
असे बलुचिस्तानचे थोडक्यात वर्णन केले. (प्रतिनिधी)

Web Title: The comparison of Kashmir-Balochistan is wrong: Ashok Shrivastav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.