संघर्ष यात्रेला संवाद यात्रेने उत्तर देऊ - मुख्यमंत्री

By Admin | Updated: April 28, 2017 03:06 IST2017-04-28T03:06:16+5:302017-04-28T03:06:16+5:30

शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच संघर्ष यात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही.

Communication Yatra to answer the struggle yatra - Chief Minister | संघर्ष यात्रेला संवाद यात्रेने उत्तर देऊ - मुख्यमंत्री

संघर्ष यात्रेला संवाद यात्रेने उत्तर देऊ - मुख्यमंत्री

पिंपरी-चिंचवड : शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच संघर्ष यात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही. तुमच्या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेतून उत्तर देऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप गुरुवारी झाला. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विविध योजनांचा पाढा वाचत विरोधकांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, ज्यांनी पंतप्रधानांच्या पॅकेजचे पैसे खाल्ले, तेच आज संघर्ष यात्रा काढत आहेत. ज्या संघर्ष यात्रेने राज्यात सत्तापरिवर्तन घडविले ती गोपीनाथ मुंडेंनी काढलेली संघर्ष यात्रा खरी होती. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेतून उत्तर देऊ. खासदार, आमदार आणि पदाधिकारी २५ लाख शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधतील. शिवाय, ही संवाद यात्रा वातानुकुलीत बसने असणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
...तर व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा
केंद्र सरकारने ११ लाख टन तूर खरेदी केली. तर राज्य सरकारने ४ लाख टन तुरीची खरेदी केली आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी सत्तेत असताना १३ लाख टन तुरीचे उत्पादन असताना केवळ २० हजार टन तूर खरेदी केली होती. २२ एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची सगळी तूर खरेदी केली जाईल. मात्र, व्यापाऱ्यांच्या तुरीचा दाणाही खरेदी केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

म्हणून बुरूज ढासळले!
सत्तेत असताना ते मालक असल्याच्या तोऱ्यात वावरले म्हणून त्यांचे बुरूज ढासळले. पिंपरी-चिंचवडमध्ये पवार, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण, सोलापुरात मोहिते-पाटील, इस्लामपूरला जयंत पाटील आणि सांगलीत पतंगराव कदम यांचे बुरूज ढासळले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Communication Yatra to answer the struggle yatra - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.