पुन्हा गृहनिर्माणच्या अभिहस्तांतरासाठी समिती
By Admin | Updated: January 6, 2016 02:00 IST2016-01-06T02:00:38+5:302016-01-06T02:00:38+5:30
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणातील कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुन्हा गृहनिर्माणच्या अभिहस्तांतरासाठी समिती
मुंबई : गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणातील कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी शेखर चन्ने, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता, सहकार विभागाचे उपसचिव डॉ. यशवंत गेडाम, सह नोंदणी महानिरीक्षक डॉ. संजय कोलते, मुद्रांक विभागाचे उपसचिव श्यामसुंदर पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मानीव अभिहस्तांतरणासाठी लागणारी कागदपत्रे, तसेच प्रक्रिया वेळखाऊ आहे. या प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल सुचवून ही प्रक्रिया अधिक जलद व सुटसुटीत होण्यासाठी गृहनिर्माण, महसूल आणि सहकार या तीन विभागांतील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक समिती तातडीने नियुक्त करावी. या समितीने सध्याचे नियम व त्यामध्ये आवश्यक असणारे बदल, तसेच या प्रक्रियेसाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, जेणेकरून सदनिका खरेदी करणाऱ्यांना याचा लाभ होईल.’ (प्रतिनिधी)