वक्फ घोटाळ्याच्या चौकशीकरिता समिती
By Admin | Updated: May 9, 2015 01:18 IST2015-05-09T01:18:56+5:302015-05-09T01:18:56+5:30
राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यातील जमिनी पुन्हा ताब्यात घेण्याकरिता व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता राज्याचे मुख्य सचिव

वक्फ घोटाळ्याच्या चौकशीकरिता समिती
मुंबई : राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यातील जमिनी पुन्हा ताब्यात घेण्याकरिता व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची स्थापना केल्याचे अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री मुखर्जी यांनी सांगितले.
राज्यातील वक्फ जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याकरिता शेख समितीची घोषणा केलेली होती. या समितीचा अहवाल सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला. त्या अहवालानुसार ज्या वक्फच्या जमिनी पुन्हा ताब्यात घेणे शक्य आहे ती कार्यवाही करण्याकरिता तसेच या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याकरिता ही उच्चाधिकार समिती स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.
अल्पसंख्याक विभागात जे अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीवर नियुक्त केले होते त्यांच्यावर त्यांच्या मूळ खात्याकडून कारवाई केली जाईल, असे मुखर्जी यांनी सांगितले. अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाले असतील तर पुढील चार वर्षांत त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. तसेच वक्फ जमिनींच्या प्रॉपर्टी कार्डांवर नोंद प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)