प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आयुक्तांचे आदेश
By Admin | Updated: June 27, 2016 02:25 IST2016-06-27T02:25:12+5:302016-06-27T02:25:12+5:30
प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मासिक गुन्हेगारी आढावा बैठकीत पोलिसांना दिले.

प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आयुक्तांचे आदेश
ठाणे : घरफोडी, मोटारसायकल आणि सोनसाखळी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून त्यावर नियंत्रण आणण्याबरोबरच प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मासिक गुन्हेगारी आढावा बैठकीत पोलिसांना दिले. यावेळी कर्तबगार अधिकाऱ्यांचा त्यांनी सत्कारही केला.
बुधवारी ठाणे पोलिसांच्या मंथन सभागृहात झालेल्या या बैठकीला सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ३३ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांचे पोलीस उपायुक्त आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी गेल्या महिनाभरातील गुन्ह्यांचा आढावाही घेतला.
मोटारसायकल चोरीचे प्रकार वागळे इस्टेट, मुंब्रा, कल्याण, भिवंडी या परिसरात वाढले आहे. सोनसाखळी चोरट्यांनीही पुन्हा डोके वर काढले आहे. मोटारसायकल आणि सोनसाखळी चोरीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी ते गेल्या महिना भरात वाढले आहे. पाच महिन्यांत ६०५ घरफोडी, १३४७ चोऱ्या, २९१ जबरी चोऱ्यांची नोंद झाली. प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कार्यवाहीचे आदेश त्यांनी दिले.
>नितिन ठाकरें याचा सत्कार
ब्रम्हांड परिसरात ज्येष्ठ नागरिकासह दुहेरी हत्याकांडाचा तसेच अंबरनाथमधील तरुणाचा आणि मुंब्रा येथील आदिवासी महिलेच्या खूनाचा मोठया कौशल्याने तपास करणारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. चिवडशेट्टी आणि उपनिरीक्षक अभिजीत भुजबळ यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
रेल्वेलाही मदत करा...
रेल्वे बंद पडण्याचे प्रकार घडतात. त्यावेळी त्याठिकाणच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल किंवा रेल्वे पोलिसांवरच आहे, असे न समजता त्यांना सहकार्य करण्यासाठीही त्याठिकाणी बंदोबस्त ठेवा. आगामी सण उत्सवांच्या दृष्टीने बंदोबस्ताची व्युहरचना करा, अशा अनेक सूचना यावेळी आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना केल्या.