मुखपत्रातून सेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका
By Admin | Updated: January 31, 2015 05:24 IST2015-01-31T05:24:35+5:302015-01-31T05:24:35+5:30
सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना वारंवार सरकारविरोधी भूमिका घेत असून भाजपासोबत समन्वय साधण्याचा प्रस्ताव धाब्यावर बसवत

मुखपत्रातून सेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई : सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना वारंवार सरकारविरोधी भूमिका घेत असून भाजपासोबत समन्वय साधण्याचा प्रस्ताव धाब्यावर बसवत पुन्हा एकदा मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
शिवसेनेने विदर्भात शिवसंपर्क मोहीम राबवण्याची केलेली घोषणा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी झालेल्या कार्यक्रमात भाजपावर केलेली टीका या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व खासदार अनिल देसाई यांच्याशी समन्वय समिती स्थापन करण्याबाबत चर्चा केली. त्याचवेळी शिवसेनेने टीकेची तोफ डागली आहे. दावोस येथे महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना शेतकरी आत्महत्या करून मरत आहे हे चित्र विदारक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. ज्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांकडे मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे मोबाईल फोनची बिले भरता, मग कर्जाचे हप्ते भरायला काय जाते? असे विचारण्याची सोय नाही, असा टोला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा नामोल्लेख न करता लगावला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यावर सर्व प्रश्न सुटतील, अशी हाळी
कुणी देत असेल तर ते दिशाभूल
करीत असल्याचेही सेनेने म्हटले आहे. दरम्यान, वृत्तपत्रामध्ये आलेल्या लेखांवर प्रतिक्रिया देण्याची आमची पद्धत नाही, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अग्रलेखावर अधिक बोलण्याचे टाळले.