गंमत निवडणूक चिन्हांची!
By Admin | Updated: October 10, 2014 05:16 IST2014-10-10T05:16:38+5:302014-10-10T05:16:38+5:30
आपापले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येकच पक्षाचे प्रयत्न सुरू असतात. परंतु, प्रस्थापित पक्ष वगळता,

गंमत निवडणूक चिन्हांची!
मुंबई : आपापले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येकच पक्षाचे प्रयत्न सुरू असतात. परंतु, प्रस्थापित पक्ष वगळता, अन्य लहान-सहान पक्ष किंवा अपक्ष उमेदवारांची निवडणूक चिन्ह मतदारांच्या किती लक्षात राहतात, हा प्रश्नच आहे. काही हटके चिन्ह मात्र उमेदवाराच्या प्रयत्नांविनाच विशेष चर्चेत राहतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मॉडेल राखी सावंत हिचे हिरवी मिर्ची हे निवडणूक चिन्हही असेच चर्चेत होते.
निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली, मात्र अद्याप कोणत्याही पक्षाला देण्यात न आलेली अशी ‘मुक्त निवडणूक चिन्ह’ अपक्ष किंवा मान्यता प्राप्त न झालेल्या पक्षांना वापरता येतात. यातीलच एखादे चिन्ह घेऊन पक्षाने निवडणुकीत किमान आठ टक्के मते मिळविल्यास ते चिन्ह पक्षाला अधिकृत चिन्ह म्हणून बहाल करण्यात येते. झाडू, रेल्वे इंजिन हीसुद्धा आधी मुक्त चिन्हे होती. मात्र आता ती विशिष्ट पक्षांची ओळख झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणारी काही निवडणूक चिन्ह इतकी वैशिष्टपूर्ण आणि हटके असतात की, ती चिन्हे वापरणाऱ्यांची मतदारांमध्ये उपरोध किंवा गमतीनेच चर्चा होत राहते. आयोगाने जानेवारी २०१३ मध्येही प्रसिद्ध केलेल्या मुक्त निवडणूक चिन्हांच्या नव्या यादीमध्येही अशी अनेक हटके चिन्ह आहेत. त्यात ब्रेड- केक- आइस्क्रीमपासून ते द्राक्ष- गाजरापर्यंत खाद्यपदार्थ; फुगा- बॅटपासून ते कॅरमपर्यंत खेळणी; एसी- कॅमेरापासून ते फ्रिझ- मिक्सरपर्यंत इलेक्ट्रॉनिकल वस्तू; कातर- करवत- दप्तर- फळा- अंगठी, अशा अनेक हटके निवडणूक चिन्हांना आयोगाने मान्यता दिलेली आहे.