चलो, ताजपिया का संदल उठेंगा...

By Admin | Updated: November 17, 2014 01:04 IST2014-11-17T01:04:07+5:302014-11-17T01:04:07+5:30

शहराच्या पूर्वेकडून वाहणाऱ्या ‘पुरवाई’वर स्वार होऊन दरवळणारा लुभानाचा स्वर्गीय सुगंध...गुलाबजलाची चौफेर होणारी शिंपडण...हिरव्याजर्द चादरीवर कुराणातील ‘आयत’ची सुरेख नक्काशी...

Come on, Tazpia's turn will rise ... | चलो, ताजपिया का संदल उठेंगा...

चलो, ताजपिया का संदल उठेंगा...

संत्रानगरीत धूम : ‘जियारत’साठी देश-विदेशातील ‘जायरीन’ नागपुरात
शफी पठाण -नागपूर
शहराच्या पूर्वेकडून वाहणाऱ्या ‘पुरवाई’वर स्वार होऊन दरवळणारा लुभानाचा स्वर्गीय सुगंध...गुलाबजलाची चौफेर होणारी शिंपडण...हिरव्याजर्द चादरीवर कुराणातील ‘आयत’ची सुरेख नक्काशी...लक्षावधी दिव्यांनी झगमगणारी रात्र...अन् सजलेल्या अश्वांच्या मधोमध चालणाऱ्या संदलाचा स्वर ऐकायला यायला लागला की नागपूरकरांची पावले आपोआप ताजाबादकडे वळतात़ यंदाही ती तशीच वळायला लागली आहेत़ कारण, वैदर्भीय संतांच्या परंपरेत नागपूरला विशेष ओळख मिळवून देणाऱ्या हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या ९२ व्या उर्सला आजपासून सुरुवात होत आहे़ देश-विदेशातील बाबांचे भक्त या निमित्ताने नागपुरात पोहचत असून बाबांची ‘मजार’ असलेल्या ताजाबाद परिसरात संदल येण्याचा क्रम सुरू झाला आहे़
संत या शब्दाचा अर्थ सद्वस्तू असा आहे. तिन्ही काळी जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्य वस्तू असते, तिलाच संत असे म्हणतात. अशाच एका महान संताच्या वास्तव्याने आपली नागपूरनगरी पावन झाली आहे़ त्या संताचे नाव हजरत बाबा ताजुद्दिन आहे़ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपुरात बांधलेले ताजाबाद शरीफ या तीर्थस्थळावर बाबांच्या उर्सच्या निमित्ताने मोठा मेळा भरला आहे़ भाविकांना नैतिक व आध्यात्मिक ऊर्जा पुरविणाऱ्या या स्थळाची कीर्ती जगभर पसरली आहे आणि म्हणूनच बाबांना मानणारा त्यांचा भक्त समुदाय जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे येऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होत आहे़
बाबा ताजुद्दिन कदाचित एकमेव असे संत असतील ज्यांचा उर्स एकाच वर्षात चार वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जातो़ यामध्ये नागपुरातील ताजाबाद, पागलखाना, पाटणसावंगी जवळील वाकी व वाकीला लागून असलेल्या काबूल-कंधार या ठिकाणांचा समावेश आहे़ बाबांचे संपूर्ण जीवनच मानवी कल्याणासाठी खर्च झाले आहे़ २१ जानेवारी १८६१ साली नागपूर जवळच्या कामठी येथे बाबांचा जन्म झाला़ त्या काळात कामठी हे शहर इंग्रजांची छावणी होती़ ताजुद्दिन बाबांचे वडील इंग्रजांच्या सेनेत सुबेदार होते़ बाबांना कामठीतीलच एक मदरशात शिक्षणासाठी पाठविण्यात आले़ अत्यंत तीक्ष्ण बुद्धीच्या असलेल्या बाबांनी अवघ्या १५ वर्षांच्या वयात उर्दू, फारसी, अरबी भाषांवर प्रभुत्व मिळवले़ २० व्या वर्षी बाबांनी लष्करात नोकरी पत्करली़ काही दिवसांनी त्यांची बदली मध्य प्रदेशातील सागर येथे करण्यात आली़ येथेही त्यांच्या आराधनेत कधी खंड पडला नाही़
रोज आपले नोकरीतील कर्तव्य आटोपून बाबा तेथील एक दर्ग्यात आराधना करायचे़ काही दिवसांनी त्यांनी ही नोकरीच सोडून दिली आणि पूर्णवेळ मानवी कल्याणासाठी झटण्याचा निर्णय घेतला़ त्यांच्या दरबारात आजही अनेक निराश मनांना जीवनाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी मिळते़ ताजुद्दिन बाबांना मानणारा भाविक हा कुठल्याही एका जाती वा धर्माचा नाही़ सर्व जाती, पंथ, संप्रदायात बाबांचे अनुयायी आहेत़ त्याचे कारण बाबांनी दिलेली एकात्मतेची शिकवण आहे़ भाविकाच्या धर्माचा पूर्ण सन्मान बाळगून बाबांनी त्यांच्या समस्येचे निराकरण केले़ म्हणूनच आज बाबांच्या सर्व दरबारात सर्व समाजाचे भाविक मोठ्या विश्वासाने माथा टेकवत असतात़ यंदाही भाविकांच्या गर्दीने ताजाबाद फुलून गेले आहे़ २४ नोव्हेंबरपर्यंत उर्सची ही धूम अशीच सुरू राहणार आहे़
आज ‘परचम कुशाई’
हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टद्वारा आयोजित ९२ व्या उर्सला आज अधिकृत प्रारंभ होणार आहे़ ट्रस्टच्या परंपरेनुसार पंचम राजे रघुजीराव भोसले यांच्या हाताने ‘परचम कुशाई’ (झेंडा वंदन) होणार आहे़ यावेळी युसूफ इकबाल ताजी, इमाम बायजीद खान अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद जहाँगीर व मुफ्ती अब्दूल कदीर खान उपस्थित राहणार आहेत़ २६ नोव्हेंबर रोजी शाही संदल दरबारात पोहोचेल़ उर्सच्या या संपूर्ण काळात २४ तास महाप्रसाद वितरित केला जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हाजी शेख हुसेन व सचिव इकबाल वेलजी यांनी दिली़

Web Title: Come on, Tazpia's turn will rise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.