आ. जाधव यांना जामीन
By Admin | Updated: December 31, 2014 01:35 IST2014-12-31T01:35:51+5:302014-12-31T01:35:51+5:30
मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांनी कायम ठेवला.

आ. जाधव यांना जामीन
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांनी कायम ठेवला. मारहाणीची ही घटना १७ डिसेंबर रोजी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल प्राईडमध्ये घडली होती.
या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले होते. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ठाकरे यांच्या भेटीसाठी कुणाला आत सोडायचे, कुणाला नाही, याची जबाबदारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर होती. कदम यांनी दार उघडून मंत्र्यांना आत घेतले होते. मात्र, जाधव यांना बाहेर थांबण्यास सांगून त्यांनी दार लावून घेतले होते. आ. जाधव यांनी ठाकरे यांच्या कक्षात जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक जाधव यांनी त्यांना थांबवले होते. त्यामुळे जाधव यांनी या पोलीस अधिकाऱ्याला थापड मारली होती. सोनेगाव पोलीस ठाण्यात आ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आ. जाधव यांनी न्यायालयात धाव घेऊन १८ डिसेंबर रोजी तात्पूरता अटकपूर्व जामीन मिळवला होता. हा जामीन कायम होण्यावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (प्रतिनिधी)