दुष्काळाविरुद्ध एकत्र लढा
By Admin | Updated: September 7, 2015 01:38 IST2015-09-07T01:38:16+5:302015-09-07T01:38:16+5:30
शरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको..

दुष्काळाविरुद्ध एकत्र लढा
दत्ता थोरे, लातूर
शरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको.. सगळे विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष आणि आपण एकत्र येऊन या परिस्थितीशी झगडूयात. आता एकमेकांची उणीदुणी नको, असे आवाहन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘आपण सारे’च्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्णातील ११३ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजारांची मदत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. गेल्या ११५ वर्षांतला हा सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. कुणीतरी चुकत असेल त्याच्यावर बोट ठेवायला आपल्याला नंतर वेळ आहे. दौरा करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन करावा. तुम्ही एक आहात म्हटल्यावर आम्ही समवेत येऊ, असे नाना पाटेकर म्हणाले.
नाना पाटेकरांचा धीरगंभीर आवाज आणि मकरंद अनासपुरेंचे विनोद सोडून शेतकऱ्यांच्या सतावणाऱ्या चिंतेचे व्यवस्था व समाजाला विचारलेले प्रश्न यामुळे वातावरण भावूक झालेले. या कुटुंबियांना मंचावरही न बोलावता थेट त्यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन नाना पाटेकरांनी धनादेश दिला आणि सोबतीला दिला जगण्याचा दुर्दम्य आशावाद व आत्महत्या न करण्याचा सल्ला.
कुराणातील आत्महत्या करणे
गुन्हा ही गोष्ट आवडते
मला कुराणातील आत्महत्या करणे हा गुन्हा आहे; देवाशी प्रतारणा आहे, हे वचन मला खूप आवडते. त्यामुळे मुसलमान माणूस आत्महत्या करीत नाही. क्वचितच तुरळक झाल्या असतील. देव म्हणजे कोण? आपल्यातील ही माणसेच. त्यांना सोडून कसं जाता येईल ?
आम्ही फक्त पोष्टमन...
मी आणि मकरंद जरी पुढे असलो तरी हे पैसे आमचे नाहीत. लोकांमध्ये संवेदना आहेत. अनेक लोकांनी आम्हाला चेक्स दिले. पैसे दिले. आम्ही फक्त पोष्टमन आहोत. तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. बाब पैशांची नाही तर आपल्याला आत ते जाणवतंय की नाही याची आहे, असे नाना म्हणाले.
वेफर्सच्या पुड्यावरती किंमत असते. गुटखा-औषधांवर असते. फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या मालावर किंमत छापलेली नसते. मी अडाणी माणूस आहे. शेतकरी आहे. एखादं पीक मेलं तर काय होतं याची मला जाणीव आहे. तुम्ही जे पिकवता त्याला हमी भाव ठरविता आला पाहीजे. कशाला काय भाव आहे हे आधीच माहीत झालं तर, मला हमीभाव पाहिजे की नाही. दुधाचा भाव १७ रुपयांनी घ्यायचा आणि बाजारात ७० रूपयाने विकायचा, हे का? असा सवाल नाना पाटेकर यांनी केला.