दोघा भारतीयांची संयुक्त आघाडी
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
येथे सुरू असलेल्या ९व्या मुंबई महापौर चषक खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारतीयांनी चमकदार कामगिरी कायम राखताना विदेशी खेळाडूंना पिछाडीवर टाकले

दोघा भारतीयांची संयुक्त आघाडी
मुंबई : येथे सुरू असलेल्या ९व्या मुंबई महापौर चषक खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारतीयांनी चमकदार कामगिरी कायम राखताना विदेशी खेळाडूंना पिछाडीवर टाकले आहे. इंटरनॅशनल मास्टर पी. श्याम निखिल याने ग्रँडमास्टर संदीपन चंदाला धक्का देत, ग्रँडमास्टर दीपतयन घोषसह संयुक्तपणे अव्वल स्थान मिळवले आहे.
वांद्रे येथील माउंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पी. श्याम निखिल व दीपतयन यांनी प्रत्येकी ५.५ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी झेप घेतली आहे, तर यानंतर तब्बल ८ खेळाडूंनी प्रत्येकी ५ गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेत अव्वल २० खेळाडूंपैकी १५ खेळाडू भारतीय आहेत.
ग्रँडमास्टर संदीपनविरुद्ध काळ्या मोहऱ्यांनी खेळताना पी. श्याम याने फारशी लोकप्रिय नसलेल्या बेंको गॅम्बीट चालीने सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे दोन प्यादे पारंपरिक पद्धतीने मारल्यानंतर, संदीपनने आक्रमण करताना उंटाच्या बदल्यात घोडा जिंकला. यानंतर, दोघांनीही आक्रमक खेळ करताना जबरदस्त हल्ले चढवले. अखेरच्या क्षणी दोघांकडेही ३ प्यादे उरले होते. मात्र, पी. श्यामने आपल्याकडे असलेल्या उंटाच्या जोरावर ५९व्या चालीमध्ये बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)